नाशिक : कोणताही शब्द न लिहिता केवळ मोजक्या रेषातील छोट्या चित्रांच्या साहाय्याने गालातल्या गालात किंवा खळखळून हसायला लावणारी किंवा एखाद्या लेखातही मावणार नाही असा आशय सांगणारी कला म्हणजे व्यंगचित्रकला होय. दि. ५ मे हा दिवस जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दि. ५ मे १८९५ मध्ये पहिले रंगीत व्यंगचित्र 'द यलो किड' मध्ये प्रकाशित झाले होते. त्या कलेचा गौरव म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्त व्यंगचित्रकार अवी जाधव यांच्याशी साधलेला संवाद...प्रश्न : आपल्या देशात व्यंगचित्रकारांची मोठी परंपरा आहे, काय सांगाल याविषयी?जाधव : आपल्या भारतात व्यंगचित्रकारांची मोठी परंपरा लाभली असून प्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे 'कॉमन मॅन' व्यंगचित्र अत्यंत गाजलेले असून इतकेच नव्हे तर अजरामर झाले आहे. त्याचप्रमाणे भारतीय व्यंगचित्रकारांचे पितामह शंकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, बी. बी. राममूर्ती, मारिओ मिरांडा, सुधीर तेलंग, बी. टी. थॉमस, एन. के. रंगा , माया कामथ अशा अनेक व्यंगचित्रकारांची परंपरा आपल्या देशाला लाभली आहे. तसेच आपल्या राज्यातही अनेक व्यंगचित्रकार आपली कला दाखवत आहेत. प्रश्न : मराठी वाङ््मय आणि कलेत व्यंगचित्राचे काय स्थान आहे?जाधव: हजारो शब्दांमधूनदेखील व्यक्त होणार नाहीत, अशा गोष्टी केवळ एका व्यंगचित्रामधून मांडणे सहज शक्य होते. कारण या एका व्यंगचित्राच्या रेषांमध्ये हजार शब्दांचा आशय सामावलेला असतो. व्यंगचित्र हा वर्तमानपत्राचा अविभाज्य घटक समजला जातो. त्यामुळे अनेक वृत्तपत्रात व्यंगचित्राला आजही विशेष स्थान देण्यात येते. तसेच दिवाळी अंकात व्यंगचित्राला महत्त्वाचे स्थान असते. अनेक पुस्तकांमध्ये आणि पुस्तकांच्या मुखपृष्ठावरदेखील व्यंगचित्र रेखाटलेली असतात. व्यंगचित्र हे एकप्रकारे समाजाचा आरसा असतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मराठी माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडली. व्यंगचित्र ही आगळीवेगळी कला आहे. जीवनातील समस्या, दु:ख बाजूला सारून मनुष्य हसला पाहिजे, हा व्यंगचित्राचा मुख्य उद्देश असतो. प्रश्न : आपण या कलेकडे कसे वळलात?जाधव : शालेय जीवनात चित्रकलेची आवड होती. त्यातून मग या कलेकडे वळालो. नाशिकमधील एका दैनिकात माझे व्यंगचित्र छापून आले. त्यामुळे माझा उत्साह वाढला. त्यानंतर दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ, तसेच आतील व्यंग मी काढू लागलो. विशेष म्हणजे ‘मार्मिक’ या साप्ताहिकातदेखील माझी व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. केंद्र सरकारच्या भारतीय टपाल खात्याने पोस्ट कार्डच्या मागील बाजूस संदेश व्यंगचित्र प्रकाशित केले आहे. ही माझ्यासाठी गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणता येईल . प्रश्न : शासकीय योजनांच्या माहिती पुस्तिका, प्रबोधनात्मक जाहिराती याकरिता आपण व्यंगचित्रे काढलीत?जाधव : प्रारंभी शालेय मुलांसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने 'येरे येरे पावसा' हे व्यंगचित्रमय पुस्तक प्रकाशित केले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव योजना पुस्तिकेत व्यंगचित्र काढले. नाशिक जिल्हा परिषदेने स्वच्छताविषयक व्यंगचित्र प्रकाशित केली. तसेच अनेक शासकीय योजनांसाठी व्यंगचित्र व जाहिराती प्रकाशित झाल्या. नाशिकच्या जल विज्ञान केंद्राने ‘पाणी’ या विषयावर प्रदर्शन भरविले होते. एका मोठ्या जाहिरातीतून शक्य होणार नाही एवढे काम एका व्यंगचित्राच्या माध्यमातून होऊ शकते, त्यामुळे व्यंगचित्रकला ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते.संवादक - मुकुंद बाविस्कर
आरोग्यासाठी मनुष्य हसलाच पाहिजे ; अवी जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 10:29 PM
मनुष्यजीवन हे नानाविध समस्या आणि अनेक चिंतांनी घेरलेले आहे. मात्र जीवनात हास्य आणि विनोद नसते तर जीवन बेचव झाले असते. त्यामुळे व्यंगचित्रे माणसाला क्षणभर का होईना हसवितात. व्यंगचित्रातून मिळणारा आनंद माणसाला दु:ख विसरायला भाग पाडतो.
ठळक मुद्देदु:ख, चिंता क्षणभर विसरायला लावणे हा व्यंगचित्रांचा उद्देशएका व्यंगचित्रामधून विविध गोष्टी मांडणे सहज शक्य व्यंगचित्रकार अवी जाधव यांचे मत