नाशिक : कथ्थक नृत्याविष्कारातून बनारस घराण्याच्या आगळ्यावेगळ्या विशेष बंदिशी या घराण्याचे नर्तक पंडित विशालकृष्ण यांनी सादर करीत उपस्थित रसिकांची मने जिंकली. तसेच नृत्यांगना आदिती नाडगौडा-पानसे यांनी सादर केलेला ‘दक्षिणा’ सव्वापाच मात्रांचा हा ताल उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवून गेला. निमित्त होते, कीर्ती कलामंदिर ह्या कथ्थक नृत्यसंस्थेच्या वतीने आयोजित नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाचे. रविवारी (दि. २२) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात या बहारदार कथक नृत्याविष्काराने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. कलामंदिराच्या वतीने सादर झालेल्या महोत्सवाचे हे २५वे वर्ष आहे. यानिमित्ताने वर्षभर संस्थेच्या वतीने ‘नृत्यानुष्ठान’ दरमहा आयोजित करून कथ्थक नृत्याचे धडे गिरविणाऱ्या शिष्य व त्यांच्या गुरुंना निमंत्रित केले होते. या नृत्यानुष्ठान उपक्रमाचा या तीन दिवसीय महोत्सवाने समारोप होणार आहे. विशालकृष्ण यांनी शिववंदनेने नृत्याविष्काराला सुरुवात केली. त्यांनी बहारदार शैलीत त्यांच्या गुरुवर्यांच्या बंदिशी सादर करीत उपस्थितांची दाद मिळविली. अभिनयातील पारंपरिक बंदिशीतून त्यांनी राधा-कृष्णाची एक अनोखी कथा रंगमंचावर मांडण्याचा प्रयत्न केला. ‘आज गोपाल लिये ब्रजबाल...’ या कथेवर आधारित पदन्यासाने कार्यक्रमाची उंची गाठली. विशालकृष्ण यांचा थाळीवरील तत्कार हा कथ्थक नृत्यप्रकार प्रेक्षकांना अचंबित करून गेला आणि नाट्यगृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. त्यांना विवेक मिश्रा (तबला), कमल पाटील (पखवाज), सोमनाथ मिश्रा (गायन), अलका गुजर (सतार) यांनी साथसंगत केली. संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेती मृदुला कुलकर्णी हिचा चांदीचे घुंगरू देऊन सन्मान करण्यात आला. विशालकृष्ण यांना नृत्यमुद्रेची प्रतिमा देऊन रेखा नाडगौडा यांनी सत्कार केला.‘जाति हूं सजनवॉँ मेरे घर...’नृत्यांगना आदिती यांनी एकल नृत्य सादर क रून उपस्थितांचा उत्साह वाढविला. त्यांनी परंपरेप्रमाणे वंदना, थाट, आमद असा वस्तुक्रम पाळत अभिनयापर्यंतचा प्रवास रसिकांपुढे सादर क रण्याचा प्रयत्न केला. त्यांना बल्लाळ चव्हाण (तबला), सुभाष दसककर (संवादिनी), आशिष रानडे (गायन), ऐश्वर्या पवार, मधुश्री वैद्य (पढत), ईश्वरी दसककर (सिंथेसायझर) यांनी साथ केली.
‘बनारस’ घराण्याच्या नृत्याविष्काराने जिंकली मने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:55 AM