नाशिक : राग श्री, राग केदार यांहस अनेक भावुक स्वर आंतरराष्टÑीय ख्यातीचे व्हायोलिनवादक मानसकुमार यांच्या व्हायोलिनमधून उमटले आणि व्हायोलिनच्या जादूई संगीताची अनुभूती रसिकांनी घेतली.कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे कुसुमाग्रज स्मरण उपक्र माचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्र माअंतर्गत प्रतिष्ठान आणि स्वरांजली संगीत संकुल यांच्या वतीने कुसुमाग्रज स्मारकातील छंदोमयी सभागृहात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युवा कलाकार मानसकुमार आणि आकाश एस यांच्या व्हायोलिन आणि बासरीवादनाची वेगळीच अनुभूती प्रत्ययास आली. मूळ आसाम येथील व्हायोलिनवादक मानसकुमार यांनी आपल्या अनोख्या सुरावटीने उपस्थित रसिकांची मने जिंकली. सुरु वातीला मानसकुमार यांनी श्री रागातील आलाप आणि मध्य लयित तीन ताल, जोड, झाला आणि बंदिशीचे सादरीकरण केले. मानसकुमार यांना तबल्यावर तन्मय रेगे यांनी साथसंगत केली. कार्यक्र माच्या अखेरीस केदार रागातील बंदीश सादर करण्यात आली. याच कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आकाश एस यांनी राग जोगचे सादरीकरण करताना आलाप, जोड, झाला पेश करत पहाडी लोकधुनीने सादरीकरण करत नाशिककरांची सायंकाळ अविस्मरणीय बनवली. दरम्यान, कलाकारांचे स्वागत स्वरांजलीच्या संचालक सुवर्णा क्षीरसागर तसेच प्रतिष्ठानचे सल्लागार अॅड. विलास लोणारी यांनी केले. प्रास्ताविक कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी केले.
मानसकुमार यांच्या व्हायोलिन वादनाची अनुभवली जादू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 1:17 AM