त्र्यंबकेश्वर : फेरीची तयारी, खासगी वाहनांनाही निर्बंधलोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : श्रावण मासानिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची होणारी गर्दी पाहता भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिरात बॅग व पिशव्या नेण्यास बंदी घालण्याचा आदेश अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. तिसऱ्या सोमवारी गर्दीचे नियोजन करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. प्रदक्षिणा मार्गावर होणारी गर्दी पाहता या मार्गावर कोणतीही बेवारस अथवा संशयास्पद वस्तू आढळल्यास त्यास स्पर्श न करता तत्काळ पोलिसांना कळविण्यात यावे, अशा सूचना अपर जिल्हा दंडाधिकारी रामदास खेडकर यांनी दिल्या आहेत. श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने भाविकांना बॅग व पिशव्या नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ५ ते ८ आॅगस्ट या दरम्यान सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्र्यंबकचे रस्ते अरूंद असून, खासगी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी वारंवार होते. त्यामुळे खंबाळा, पहिनेबारी, अंबोली टी पॉर्इंट येथून त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी, रिक्षा, चारचाकी, दुचाकी व इतर खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या प्रवेशबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा अपर जिल्हा दंडाधिकारी रामदास खेडकर यांनी दिला आहे.
मंदिरात पिशव्या नेण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 11:48 PM