नाशिकरोड : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सुभाषरोड भागातून कॅण्डल मार्च काढण्यात आला. कठुआमध्ये आठ वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार व खुनाच्या घटनेनंतर उन्नाव, सुरत व रोहतक येथेदेखील मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या अमानुष दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ व संशयितांना फाशी देण्यात यावी या मागणीसाठी सुभाषरोड येथून बुधवारी सायंकाळी कॅण्डल मार्च काढण्यात आला. कॅण्डल मार्चमध्ये सर्व स्तरातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कॅण्डल मार्च सुभाषरोड येथून आंबेडकर पुतळा, शाहू पथ, दुर्गा उद्यान कॉर्नर, मुक्तिधाम मार्गे शाळा क्रमांक १२५ च्या मैदानापर्यंत काढण्यात आला. कॅण्डल मार्चमध्ये सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी व विशेष करून परिसरातील महिला, युवती, लहान मुले हातात मेणबत्ती, निषेधाचे फलक व काळे कपडे घालून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.देवळाली कॅम्पला काळ्या फिती लावून निषेधजम्मू-काश्मीर येथील कठुआ व उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे मुलींवर झालेल्या अतिप्रसंगाच्या निषेधार्थ देवळाली कॅम्पमध्ये सर्वधर्मीयांच्या वतीने हाताच्या दंडावर काळ्या फिती बांधून, मेणबत्त्या पेटवून कॅण्डल मूक मार्च काढण्यात आला. कठुआमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर अमानुषपणे मानवी अत्याचार करत तिचा निर्दयीपणे खून करण्यात आला. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातील उन्नाव, सुरत, रोहतक येथेदेखील मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या. या घटनेच्या निषेधार्थ व संशयितांना फाशी देण्यात यावी या मागणीसाठी देवळालीच्या जुन्या बसस्थानक येथून सर्वपक्षीय समाजबांधव व महिलांनी हातावर काळ्या रिबीन बांधून, मेणबत्ती पेटवून निषेधाचे फलक हातात घेत हमरस्त्यावरून मूक मार्च काढण्यात आला. यावेळी अफझल खान, यास्मिन नाथानी, अजिजभाई शेख, रिपाइंचे गौतम पगारे, सुरेश कदम, उजेफ शेख, इब्राहिम शेख, आफ्रिदी शेख, डॉ. अब्दुलबाबा शेख, सीमा पगारे आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला सहभागी झाले होते.कडक कारवाईची मागणीकठुआ, उन्नाव येथे घडलेल्या अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी अत्याचारविरोधी कृती समितीतर्फे शिवाजीरोड येथील डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ मेणबत्ती पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी वामनराव गायकवाड, अविनाश अहेर, करुणासागर पगारे, राहुल तूपलोंढे, सनी गांगुर्डे, गौतम बागुल, भीमराव गांगुर्डे, नीलेश शिंदे आदी उपस्थित होते.
नाशिकरोडला कॅण्डल मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:55 AM