सभापती संतप्त : अधिकाºयांच्या अनुपस्थितीमुळे सभा तहकूब
नाशिक : महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय समितीच्या सभेला अधिकाºयांनी दांडी मारल्याने सभापतींनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभा तहकूब केली. सभापतींच्या या नाराजीचे पडसाद नंतर महापौरांनी बोलाविलेल्या विषय समित्यांच्या बैठकीत उमटले.महापालिकेच्या आरोग्य समितीची सभा सोमवारी (दि.११) सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आली होती. नियोजित वेळेनुसार, सभापतीसह सदस्य सभेला हजर झाले. परंतु, एकमेव आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे वगळता कुणीही हजर झाले नाही. यावेळी सभापती सतीश कुलकर्णी यांनी आरोग्याधिकाºयाला जाब विचारला असता काही अधिकारी हे आयुक्तांनी बोलाविलेल्या बैठकीला उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सदस्यांच्या संतापात आणखी भर पडली. संतप्त सभापतींनी सदर सभा तहकूब केली. त्यानंतर महापौरांनी बोलाविलेल्या बैठकीत सतीश कुलकर्णी यांनी प्रशासनातील अधिकाºयांच्या अनास्थेवर आसूड ओढले. आरोग्य समितीची नियोजित बैठक ११.३० वाजता असताना अन्य कोणत्याही बैठकीचे नियोजन करताना त्याची दक्षता नगरसचिव विभागाने का घेतली नाही, असा सवालही कुलकर्णी यांनी केला. आरोग्य सभापतींनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर महापौर रंजना भानसीही आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर भडकल्या. आरोग्याधिकाºयांना काम करायचे आहे किंवा नाही, असा थेट सवाल करत कामकाजात सुधारणा न झाल्यास महासभेत बसू न देण्याचा इशारा दिला. रस्त्यांवर पडलेले डेब्रीजचे ढिगारे आठ दिवसांत हटविण्याचे आदेश महापौरांनी दिले. याशिवाय, विषय समितीच्या सभेत टोलवाटोलवी केल्यास संबंधित अधिकाºयांवर कारवाई केली जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.