नाशिक : राष्ट्रीय मतदार याद्यांच्या अद्यावतीकरण करण्याचा भाग म्हणून मतदारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेवर शिक्षकांनी बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतल्याने या संदर्भात निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी जिल्हा परिषद व निवडणूक शाखेला शिक्षकांची मनधरणी करावी लागली. केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ म्हणून शिक्षकांना नेमण्याऐवजी अन्य शासकीय घटकांचीही याकामी नेमणूक करावी या मागणीवर अडून बसलेल्या शिक्षकांची समजूत घालण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविकांना बीएलओचे काम देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले, मात्र ऐनवेळी या आश्वासनाची पूर्तता होणे कठीण असल्याने मोहिमेचे भवितव्य धोक्यात आले आहे. मतदार याद्यांच्या अद्यावतीकरणात प्रत्येक मतदारांचे आधारक्रमांक घेण्यात येणार असून, त्यासाठी थेट मतदान केंद्रांवर सोय करण्यात आली आहे. रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेवर राज्य प्राथमिक शिक्षक समितीने यापूर्वीच बहिष्कार टाकून बीएलओ या कामात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते. या मोहिमेसाठी सुमारे सहा हजारांहून अधिक शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे व त्यांच्यामार्फतच मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्यात येणार आहे, परंतु बहिष्कारामुळे रविवारच्या मोहिमेविषयी साशंकता व्यक्त केली जात असतानाच शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गीतांजली बाविस्कर यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेत शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिक्षकांनी मतदार याद्यांच्या अद्यावतीकरणाच्या राष्ट्रीय कामात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले, परंतु शिक्षक संघटनांनी शिक्षकांवर लादण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांबाबात तक्रार केली. या कामासाठी इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी यावर संघटना ठाम असल्याने अखेर निम्मे शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना हे काम देण्याचे मान्य करण्यात आले. त्यामुळे शिक्षक संघटनेने काहीसे सकारात्मकता दर्शविली असली तरी, शिक्षकांऐवजी अन्य कर्मचाऱ्यांना हे काम देण्याबाबतचे आदेश कधी व कसे निघणार या विषयी संभ्रम आहे. या बैठकीस शिक्षक संघटनेचे काळूजी बोरसे पाटील, अंबादास वाजे, दादाजी सावंत, आर. के. खैरनार, मोठाभाऊ साळुंके, केदू देशमाने आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मनधरणी : शिक्षकाऐवजी ग्रामसेवक, तलाठी नेमणार
By admin | Published: May 16, 2015 11:27 PM