मांडवड : नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे एका विहिरीत तबल साडेसहा फुटाचा नाग (कोब्रा) सापडला. गावापासून थोड्यात अंतरावर बळीराम आनंदा आहेर यांच्या शेतातील विहिरीत गेल्या दोन महिन्यांपासून मोठा नाग पडला होता. तो कधी दिसायचा तर कधी नाही असे त्यांच्या मुलाच्या लक्षात आले. त्यांनी मित्र नवनाथ आहेर यांना याबद्दल माहिती दिली. त्यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना पाचारण केले. त्यांनी कुठलाही विलंब न करता मांडवड येथे पोहोचून आहेर याच्या मळ्यातील विहिरीत असलेला नागाची सुटका करण्याचे ठरविले. गावातील सुशील आंबेकर, दत्तू निकम,नवनाथ आहेर,किशोर आंबेकर, भास्कर आहेर, दिनकर आहेर, राहुल आहेर, सोनू आहेर यांच्या मदतीने विहिरीत बाज सोडून मोठ्या शिताफीने स्टिकच्या साहाय्याने अथक परिश्रमाने अतिविषारी कोब्रा जातीचा नाग व धामण अशा दोन सापांना विहिरीतून बाहेर काढले आणि बरणीत टाकले.
बडोदे म्हणाले की, आजपर्यंत तालुक्यात कधी एवढ्या मोठ्या आकाराचा नाग आढळून आला नाही. हा नाग साडेसहा फुटाच्या जवळपास आहे. याची नोंद वनविभागाच्या कार्यालयात करून या सापाला जंगलात सोडून दिले जाईल. विजय बडोदे यांचे मांडवड येथील शेतकऱ्यांनी आभार मानले.