सिन्नर : जो निघेल घराच्या बाहेर, त्याला मी देतो ‘कोरोना’चा दम. मी आहे यम, मी आहे यम, मी आहे यम! चित्रगुप्त... जी महाराज...गावात विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांच्या नोंदी ठेवा. यमदूत... जी महाराज....तुम्ही त्याचा अहवाल तातडीने सादर करून 'त्यांना' मृत्युदंडाची शिक्षा द्या. आ ऽऽ हाहाहा ....आ ऽऽ हाहाहा....असा संवाद कानी पडताच मनेगांव आणि धोंडवीरनगरवासीयांच्या काळजात धस्सं होतं. गरज नसताना खरचं आपण घराबाहेर पडायला नको, नाहीतर उगाच कोरोनाची शिकार होऊन मृत्यूला जवळ करू, अशी धास्ती मनात निर्माण होते. सुमारे वीस मिनिटांच्या या पथनाट्यातून कोरोनाबाबत अनोखी जनजागृती घडून येत असून त्यात मनेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक माधव यादव, आरोग्य कर्मचारी पी. एस. धापसे, आणि ग्रामपंचायत कर्मचारी रंगकर्मी भाऊसाहेब सोनवणे सहभागी झाले आहेत.विशेष म्हणजे ग्रामसेवक माधव यादव स्वत: यमराजाची, धापसे हे यमदुताची तर भाऊसाहेब सोनवणे हे चित्रगुप्ताची भूमिका साकारत आहेत. जीपगाडीवर ध्वनिक्षेपक लावून अफलातून वेशभूषा साकारलेले हे पथनाट्य गल्लोगल्लीत गेल्यानंतर गावकरी घराच्या खिडकीतूनच बघून त्याला दाद देतात.केल्या कर्माचा हिशेब ठेवणारा चित्रगुप्त, त्याची इत्यंभूत माहिती यमराजाला देणारा यमदूत आणि त्यावर अंतिम निर्णय घेत शेवटची बोलावणी करणारा यमराज, हे सारे नाटिकेतून काल्पनिक वाटत असले तरी त्याची नुसती कल्पनाही काळजाचा ठोका चुकवते.कोरोनाच्या काळात चुकीचे काम करणाऱ्यांना या नाटिकेतून एक प्रकारे संदेश देण्याचे अनोखे समाजकार्य या तिन्ही शासनाच्या सेवकांनी हाती घेतले आहे. त्यामुळे सदर पथनाट्य परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
मनेगावचे ग्रामसेवक बनले ‘यमराज’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:21 PM