नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकात सोमवारी सकाळी येत असलेल्या मंगला एक्स्प्रेसच्या बी-२ बोगीखालील चाक नादुरुस्त झाल्याचे वेळीच लक्षात आल्याने पुढील अपघाताचा मोठा अनर्थ टळला. मंगला एक्स्प्रेस जागेवरच थांबवून दुरुस्ती करण्यात आल्यानंतर चार तास उशिराने मुंबईकडे रवाना झाली. नाशिकरोड रेल्वेस्थानकात सोमवारी सकाळी ६.४० च्या सुमारास मंगला एक्स्प्रेस येत असताना बी-२ बोगीखाली कसलातरी आवाज येत असल्याचे व त्यामुळे माती उडत असल्याचे रेल्वेतील कंडक्टर व्ही. टी. मसराम यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित चेन ओढून मंगला एक्स्प्रेस थांबविली. बी-२ बोगी खालील चाकांची पाहणी केली असता एका चाकाची स्प्रिंग उडून पीन निघाली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे गाडी पुढे नेण्यास धोका असल्याचे रेल्वेचालकाने सांगताच तातडीने सदर घटनेची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर जागेवरच थांबविलेल्या मंगला एक्स्प्रेसच्या बी-२ बोगीखालील चाकाची दुरुस्ती केल्यानंतर चार तास उशिराने सकाळी १०.३० वाजता मुंबईकडे रवाना झाली. रेल्वे बोगीखालील चाक नादुरुस्त झाल्याने वेळीच लक्षात आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
मंगला एक्स्प्रेसच्या चाकात बिघाड; गाडीला चार तास विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 1:35 AM