ठळक मुद्देअनेकांच्या घरावरचे पत्रे, कौले उडून गेल्याने संसार उघड्यावर
पेठ : तालुक्यात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वादळ सुटल्याने, आंबापिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ऐन तोडणीच्या वेळी आंबा भुईसपाट झाला. आंबा उत्पादक शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या ताउते वादळाचा पेठ तालुक्यालाही तडाखा बसला असून, यामध्ये घरांचेही नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरावरचे पत्रे, कौले उडून गेल्याने संसार उघड्यावर आले आहेत. फळबागा भुईसपाट झाल्या असून, आंबा, पपईची झाडे मोडून पडली आहेत. पेठ तालुक्यात या वर्षी कोरोनाने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना आंबा पिकापासून दोन पैसे मिळतील, अशी आशा असताना या वादळी संकटाने शेतकरी आर्थिक खाईत लोटला गेला आहे.