खामखेडा : देवळा-कळवण व गिरणा नदीकाठावरील खामखेडा गावाच्या दोन्ही बाजूंनी आंब्यांच्या अनेक जातीची झाडे आहेत. या भागात आंब्याचे भरपूर प्रमाणात उत्पादन होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हवामानात झालेल्या बदलामुळे आंब्याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.सध्या गिरणा परिसरातील व शिवारातील आंब्याच्या झाडांना फळधारणा झाली असून, काही झाडांना मोहर येणे अजून बाकी आहे. पूर्वी गिरणा नदीकाठावर आंब्याच्या अनेक जातींची मोठ्या प्रमाणात झाडे होती. परिसराला आमराई म्हणून ओळखले जाई. या ठिकाणी शेंद्र्या, दोडी साखऱ्या, पिठाळ्या, भोपळ्या, कलम्या अशी चव, रंग व आकारानुसार आंब्याच्या झाडाला नावे होती. कालांतराने आंब्याची जुनी झाडे मोठ्या प्रमाणात तोडली गेली. त्यांच्या जागी नवीन रोपांची लागवड करण्यात आली. मात्र ती गावठी आब्यांची न होता कलमी आब्यांची झाली. ती चवदार नाही. पूर्वी शेतातही भरपूर प्रमाणात आंब्याची झाडे असायची. त्यामुळे प्रत्येकाकडे भरपूर आंबे असायचे. हळूहळू शेतीचा विकास झाला व शेतातील आंब्याची झाडे नष्ट झाली. त्यामुळे एकेकाळी शिवारात दाट दिसणारी आंब्याची झाडे आता दिसत नाहीत. गावठी आंब्यांची झाडे काढून टाकल्याने त्यांच्या जागी कलमी आंब्याची झाडे लावली गेली आहेत. ही झाडे फार उंच वाढत नाहीत, लवकर बहारही येतो, परंतु चव गावठी आंब्याची नाही, अशा प्रतिक्रि या जुन्या जाणकारांकडून ऐकावयास मिळतात. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या हवामान बदलाचा आंबा पिकावर परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (वार्ताहर )
आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता
By admin | Published: February 13, 2017 11:58 PM