द्याने : द्यानेसह उत्राणे, आसखेडा, वाघळे, खामलोण, फोपीर परिसरात थंडीचा कडाका जाणवू लागल्याने रब्बी पिकांसह मोसम परिसरातील आंब्यांना दिलासा देणारी बाब आहे. यंदा आंबा पिकास मोठ्या प्रमाणात मोहर असल्याचे चित्र दिसत आहे; मात्र गतवर्षीही सुरुवातीला असेच पोषक वातावरण होते. त्यामुळे आंबा उत्पादकांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने आंब्याचे मोठे नुकसान झाले होते. डिसेंबरच्या शेवटी जोरदार थंडी जाणवू लागल्यामुळे थंडीवर अवलंबून असलेल्या पिकांना पोषक असल्याने शेतातील पिके व आंब्याच्या झाडाला मोठ्या प्रमाणात पालवी फुटली असून, काही ठिकाणी पालवी फुटून बहराचा अवधी झाला आहे. सध्या काही झाडांना अद्याप पालवी फुटण्याची प्रक्रिया सुरू आहे. आंब्याला मोहर येण्यासाठी थंडीचा जोर लागतो, यावर्षी अपेक्षेपेक्षा जास्त थंडी असल्यामुळे लहान मोठ्या आंब्याच्या झाडाला मोहर आला आहे. मोहर येऊन फळधारणा झाल्यास हा आंबा मार्चअखेर बाजारात येतो. गावठी आंब्याला आलेला पहिला मोहर हा चांगला व मोठे फळ देणारा मानला जातो, सर्वाधिक गावठी कैरींना मुंबई, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, मालेगाव आदि बाजारपेठेत जास्त मागणी असते, परंतु यंदा अवकाळी पाऊस नसला तरी ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
द्याने परिसरात आंबा बहरला
By admin | Published: January 22, 2017 11:45 PM