मनमाड : जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या मनमाड शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा तसेच शहराच्या गंभीर पाणीप्रश्नासह इतर समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने येथील डॉ.आंबेडकर पुतळ्यासमोर सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाच्या आजच्या पाचव्या दिवशीही तोडगा न निघाल्याने अखेर मनमाड शहर व्यापारी महासंघाच्या वतीने मनमाड बंदची हाक दिली. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, मनमाड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.नागरी मूलभूत सुविधांअभावी शहराची दैनावस्था झाली आहे. साक्री तालुक्यातील तहसील कार्यालयाचे विभाजन करून पिंपळनेर येथे अपर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर मनमाड शहराला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, तोपर्यंत मनमाड येथे अपर तहसील कार्यालय सुरू करावे, शहरासाठी कायमस्वरूपीची ग्रॅव्हीटीची पाणी योजना सुरू करावी, पालिकेच्या कामाचे फेर आॅडिट करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी क्रांतिदिनी बचाव समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्या नंतर १० ते १४ आॅगस्टदरम्यान शहरातील विविध संस्था व संघटनांच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आल्यानंतरही प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने अखेर १६ आॅगस्टपासून समितीचे कार्यकर्ते भीमराज लोखंडे, विष्णू चव्हाण, पोपटलाल बेदमुथा, किसनलाल बंब, कैलास शिंंदे, महेंद्र गरुड हे आमरण उपोेषणाला बसले.पाचव्या दिवशीही उपोषण सुरू राहिल्याने असंतोष वाढत गेल्याने व्यापारी महासंघाने शहराध्यक्ष राजाभाऊ पारीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मनमाड बंदचा निर्णय घेतला. आज सकाळी एकात्मता चौकातून भव्य रॅली काढण्यात आली. गांधी पुतळा, सराफ बाजार, शिवाजी चौक, नेहरू भवन, तेली गल्लीमार्गे निघालेल्या फेरीचा डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. या ठिकाणी उपोषणकर्ते पोपटलाल बेदमुथा यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका विशद केली. शहरात खासगी आस्थापना, दुकाने बंद असल्याने शहराच्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. बंदमुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले होते. (वार्ताहर)
मनमाडला कडकडीत ‘बंद’!
By admin | Published: August 21, 2016 12:17 AM