मनमाड : येथील अमरतारा परिसरात नववर्षाचा जल्लोष सुरू असताना फटाक्यांची ठिणगी पडून दुकानाला लागलेल्या आगीत दीड लाख रुपयांचा ऐवज जळून खाक झाला आहे.सुनील झुंबरलाल शर्मा, रा. मनमाड यांनी मनमाड शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या कटलरी दुकानाच्या परिसरात रात्री अज्ञात युवक नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष करत होते. या वेळी सुरू असलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये फटाक्याची ठिणगी दुकानावर पडल्याने आग लागली. या आगीमध्ये कटलरी दुकानातील वस्तू जळून एक लाख चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मनमाड पोलिसात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)
मनमाडला आगीत दीड लाखांचे नुकसान
By admin | Published: January 02, 2016 10:31 PM