लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : मालेगाव चौफुलीवर शहर पोलिसांच्या गस्ती पथकाने सुमारे दोन कोटी रुपयांच्या नोटा हस्तगत करून दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी आयकर विभागाला माहिती दिली असून, आयकर अधिकारी चौकशी करीत आहेत. मनमाडचे पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना मालेगाव - पुणे महामार्गावरून जात असलेल्या इन्होवा गाडीची (क्रमांक एमएच १२ डीवाय ५७३६) तपासणी केली असता गाडीमध्ये एक कोटी ९८ लाख रुपयाच्या नोटांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. या नोटांबाबत माहिती न दिल्याने पोलिसांनी नोटा हस्तगत करून दोन जणांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात नोटा आणल्यानंतर बॅँकेच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. बॅक अधिकाऱ्यांनी मशीनच्या सहाय्याने मोजणी केली असता एक कोटी ९८ लाख २३ हजार तीनशे रुपयांच्या नोटा आढळून आल्या.या प्रकरणी महादेव मार्कंडे, व मोहन शेलार (रा. पुणे) यांना चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान शहर पोलिसांनी याबाबत आयकर विभागाला कळविले असून अधिक चौकशी करण्यात येत आहे. सदरच्या नोटा पुणे येथील एका प्रथितयश बिल्डरच्या असून मालेगाव येथील व्यवहार फिसकटल्याने सदर व्यक्ती नोटांसह परत जात असल्याचे बोलले जाते.
मनमाडला दोन कोटी रुपयांच्या नोटा हस्तगत
By admin | Published: June 25, 2017 12:34 AM