नाशिक : नाशिक-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस आजपासून नव्या रंगात, नव्या सोयीसुविधांसहीत प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. या एक्स्प्रेसला सर्वच्या सर्व 21 नवीन डबे जोडण्यात आले आहेत. यामध्ये आरामदायी बैठक व्यवस्था, मोबाइल चार्जिंगची सुविधा, कचरा पेटीची व्यवस्था, साऊंड सिस्टिम, सीसीटीव्ही, अशा अत्याधुनिक सोयीसुविधा पंचवटी एक्स्प्रेसमध्ये उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. रेल परिषदेने केलेल्या सूचना स्वीकारत, रेल्वेने नव्या रुपात ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. बुधवारी (9 मे) सकाळी 7.15 वाजता नाशिकरोड स्थानकात दाखल झालेल्या एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
दरम्यान, रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालंय. रेल्वे प्रवाशांसाठी झटणाऱ्या बिपीन गांधी यांनी 'आदर्श - पंचवटी एक्सप्रेस' सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आजपासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. मात्र ही एक्स्प्रेस नाशिक रोड रेल्वे स्थानकात येण्याच्या पाच मिनिटांपूर्वी बिपीन गांधी यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला व त्यांचे निधन झाले.