मनमाड : गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडून कार्यान्वित करण्यात आलेल्या रमाई घरकुल योजनेच्या लाभापासून अनेक लाभार्थी वंचीत असून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनमाड शहर रिपाई युवा शाखेच्या वतीने पालिका कार्यालसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी ढोल बजाव हे अनोखे आंदोलन करून शासनाला जाब विचारण्यात आला. मागासवर्गीय जनतेला हक्काचा निवारा मिळावा या हेतूने शासनाकडून रमाई घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. पालिका प्रशासन व समाज कल्याण विभाग यांच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक लाभार्थी या योजने पासून वंचित आहे.या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी रिपाई युवा शाखेच्यावतीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.रिपाई चे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र अहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली पालिका कार्यलयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला शहरातील विविध पक्ष व संघटना यांच्या प्रतिनिधींनी समक्ष भेटून पाठिंबा दिला आहे. लाभार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी आज पालिका प्रवेशद्वारावर ढोल बडवून ढोल बजाव आंदोलन केले. संघटनेच्या वतीने आपल्या मागण्याचे निवेदन प्रशासणाला देण्यात आले असून निवेदनावर युवा जिल्हाध्यक्ष रु पेश अहिरे ,युवा शहराध्यक्ष गुरु कुमार निकाळे, प्रमोद अहिरे, दिलीप नरवडे, सुशील खरे, कैलास अहिरे, महेंद्र वाघ, सुरेश जगताप, बाबा शेख, रवी खैरनार,राजू ढेंगे, दिनकर कांबळे, पापा शाह, धनंजय अवचारे, पांडुरंग पगारे, दिनेश झोडपे यांची नावे आहे.
मनमाडला रिपाईचे ‘ढोल बजाव’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 2:05 PM