नाशिक : महापालिकेला एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारापोटी माहे आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या तीन महिन्यांचे १२ कोटी ५९ लाख रुपये वितरित करण्याचे आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काढले आहेत. याच काळात नोटाबंदीचा फटका मुद्रांक विक्रीलाही बसल्याने महापालिकेच्या अनुदानात त्यामुळे सुमारे अडीच ते तीन कोटींनी घट झाली आहे.महापालिकेला राज्य शासनाकडून एलबीटी अनुदानाबरोबरच एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभाराचीही रक्कम दरमहा मिळत असते. गेल्या पाच महिन्यांपासून महापालिकेला एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभाराची रक्कम प्राप्त झालेली नाही. मात्र, आता राज्य शासनाने आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या काळातील एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारापोटी १२ कोटी ५९ लाख रुपये वितरित केले आहेत. केंद्र सरकारने आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१६ याच काळात नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्याचा फटका मुद्रांक विक्रीवरही झाला होता. एरव्ही महापालिकेला मुद्रांक शुल्क अधिभारापोटी दरमहा सुमारे साडेचार ते पाच कोटी रुपये उपलब्ध होतात, परंतु आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील केवळ १२ कोटी ५९ लाख रुपयेच हाती पडणार आहेत. त्यामुळे महापालिकेलाही सुमारे अडीच ते तीन कोटींचा फटका बसणार आहे.
मनपाला मुद्रांक शुल्क अधिभारापोटी १२ कोटी
By admin | Published: March 25, 2017 9:47 PM