पंचवटी : हिरावाडी परिसरातील अयोध्यानगरी, भार्गवराम, अभिराम तसेच लोकाभिराम या शासकीय योजनेतून उभारलेल्या वसाहतीतील काही नागरिकांनी मनपाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बंगल्याभोवती वाढीव संरक्षित कुंपण घालून, तर कोणी मजल्यावर मजले चढवून पक्के बांधकाम केल्याने अयोध्यानगरीला अतिक्रमणनगरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, काही नागरिकांनी बंगल्याचे वाढीव बांधकाम करताना चक्क वीज वितरण कंपनीच्या विद्युत खांबाभोवती संरक्षक भिंत घातली आहे, तर काहींनी थेट रस्त्याला लागून सीमेंटचे ओटे बांधून मनपाच्या नियमांची उघडपणे पायमल्ली केल्याचे दिसून येते. परिसरात अजूनही विनापरवाना मजले बांधकाम सुरू असून, सदरची बाब मनपाच्या निदर्शनास आल्यानंतर विनापरवाना बांधकाम करणाऱ्या काहीं बांधकामांना मनपा प्रशासनाने नोटिसा दिल्याचे समजते. परिसरात राहणाºया काहींनी तर घरासमोर बांधकाम करून दुकाने थाटली. काहींनी चारचाकी वाहने बंगल्यात नेता यावी यासाठी चक्क रस्ता आपल्याच मालकीच्या जागेतील समजून अर्धा रस्त्यावर काँक्रि ट टाकून कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात अनेकांनी पूर्वी असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी नवीन तसेच वाढीव बांधकाम करताना परवानगी घेतली आहे की नाही याची तपासणी करणे गरजेचे असून, ज्यांनी बांधकाम परवानगी घेतली त्यांचे ठीक आहे; परंतु ज्यांनी परवानगी न घेताच बांधकाम केले त्यांच्याकडे मनपा नगररचना विभाग लक्ष केंद्रित करून काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हिरावाडी परिसरात अयोध्यानगरी की अतिक्र मणनगरी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:21 AM