४ जानेवारी २०२१ पासून नववी ते बारावीचे वर्ग शाळा सुरू करण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. त्यासोबतच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड चाचणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. मालेगाव महानगरपालिका कोविड-१९ चाचणीचा खर्च करायला तयार नाही. त्यामुळे हा खर्च कोण करेल, असा प्रश्न पडला आहे. खासगी लॅबमध्ये टेस्ट करा असा आदेश महानगरपालिकेने दिला. प्रशासन याकडे गांभीर्याने दुर्लक्ष करत आहे. खासगी लॅबमध्ये किट उपलब्ध आहे. मग महानगरपालिकेच्या लॅबमध्ये का नाही? शिक्षणाधिकारी झनकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोमवारपर्यंत निर्णय देऊ असे सांगितले. ग्रामीण भागातील शिक्षकांना दाभाडी सेंटर येथे मोफत तपासणी करण्यात येत आहे, मग येथे का नाही? महानगरपालिकेतील मालेगाव शहरातील एकही कर्मचाऱ्याची टेस्ट सकाळी सोयगाव येथे आज करण्यात आली नाही? व जर का महानगरपालिका टेस्ट करीत नसेल तर एकही शिक्षक कोरोना चाचणी करणार नाही, असे नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने सचिव प्रा. अनिल महाजन, तालुकाध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे यांनी कळविले आहे.
महापालिका आयुक्त यांची भेट घेतली होती. त्यांनी महापालिकेकडे निधी नसल्याने खासगी टेस्ट करावी असे सांगितले होते. मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती यांची भेट घेतली होती. आमदार मौलाना मुफ्ती यांच्या आमदार निधीतून टेस्ट करावी असे आयुक्त व जिल्हाधिकारी यांना कळविले होते. उपायुक्त नितीन कापडणीस यांना भेटलो. मोफत टेस्ट करावी असे पत्र दिले. त्यांनी सांगितले की आमच्याकडे मोफत टेस्टसाठी निधी नाही. आमदार निधीतून टेस्टसाठी तसा निधी महापालिकेला द्यावा. तरच आम्ही आदेश देऊ, असे त्यांनी सांगितले. नाशिक महानगरपालिकेने जर कोविड चाचणी मोफत करण्यासाठी मालेगाव महानगरपालिकेला काय अडचण आहे, असा सवाल विचारला जात आहे.