महापालिकेच्यावतीने कोरोना काळात संसर्ग टाळण्यासाठी थुंकी बहाद्दर तसेच मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली. त्यानंतर महापालिकेने आतापर्यंत ७४ जणांवर कारवाई करून ६९ हजार ८९९ रुपयांची वसुली केली आहे. केवळ दंड केल्यास संबंधित नागरिक तो भरून मोकळे होतात; परंतु तसे हेाऊ नये, यासाठी संबंधितांकडून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आणि अन्य कामे करून घेतली जात असून, काहींकडून त्याच परिसरात जनप्रबोधन करून घेतले जाते. सध्या कोरोना काळ असल्याने तंबाखू, गुटखा खाऊन थुंकू नका, तसेच मास्कचा वापर करा, असे संबंधितांकडून सांगितले जाते. मास्कचा वापर न करणारे बरेच जण तंबाखू, गुटखा खाऊन थुंकत असल्याने त्यांना प्रतिबंध करण्यासाठी महापालिका गांधीगिरी करून एक मास्कदेखील भेट देत असल्याची माहिती घनकचरा विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी दिली. मास्कचा वापर न करणाऱ्या ८१ जणांकडून १६ हजार २०० रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे.
दरम्यान, २५ ते ३१ डिसेंबर या आठवडाभरात विविध ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून शहरात अस्वच्छता करणाऱ्यांकडून महापालिकेने दंडात्मक कारवाई करून १ लाख ८९ हजार ९०० रुपये मिळवले आहेत. यात नदी, नाले अस्वच्छ करणाऱ्या तीन जणांकडून ६०० रुपये, रस्त्यांवर अस्वच्छता करणाऱ्या ३३ जणांकडून ३६ हजार ८२० रुपये, मेाकळ्या जागेवर डेब्रीज टाकण्याच्या २२ प्रकरणात ३१ हजार २०० रुपये या प्रमाणे दंड करण्यात आला आहे.
कोट..
रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून केवळ दंड वसूल करण्याकरिता त्यांना स्वच्छतेची कामे करण्यास भाग पाडल्यास त्यांनादेखील चुकीची आणि आरोग्यविषयक जाणिव होईल, त्या दृष्टिकोनातून संबंधितांकडून कामे करून घेतानाच त्यांना मास्कदेखील दिला जातो.
- डॉ. कल्पना कुटे, संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग