नाशिक : महानगरपालिका ही युती सरकारवर उदार आहे काय? असा प्रश्न राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केला आहे.यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरात विविध ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अनधिकृत होर्डिंग व बॅनर लावण्यात आलेले दिसत आहे. शहराला ‘स्मार्ट सिटी’मध्ये जाण्याचा मार्ग खुला असताना शहराचे विद्रुपीकरण हे युती सरकार करताना दिसत आहे. शहरात भारतीय जनता पार्टीचे विकास पर्व व शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त अनेक ठिकाणी अनिधकृत होर्डिंग व बॅनर सर्रासपणे लावण्यात आले आहे. जागोजागी लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग व बॅनरवर आयुक्ताचे लक्ष न जाणे म्हणजे नवलच आहे. भंगार बाजार, पाणीप्रश्न व खतप्रकल्प अशा विविध प्रश्नांवर आयुक्तांना भारतीय जनता पार्टीने धारेवर धरून त्यांच्या बदलीची मागणी केली होती. त्यांना घाबरून तर आयुक्तांनी या अनधिकृत होर्डिंग व बॅनरवर दुर्लक्ष केले नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहर नेहमी स्वच्छ व सुंदर दिसावे, याकरिता मनपा नेहमी प्रयत्नशील असल्याचा दिखावा केला जात असल्याचे यातून निदर्शनास येत आहे. उच्च न्यायालयात यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची सुनावणी होऊन अशा अनधिकृत होर्डिंग व बॅनर लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश दिले आहे.
सत्ताधाऱ्यांवर मनपा मेहेरबान
By admin | Published: June 19, 2016 11:09 PM