बस कंपनीवरून मनपात ‘खडखड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 01:23 AM2019-01-20T01:23:29+5:302019-01-20T01:29:38+5:30
महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात परिवहन समिती स्थापन करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात मात्र भाजपाच्या महापौरांनी बस कंपनी करण्याचा ठराव प्रशासनाला पाठविला. त्यामुळे इतिवृत्तातील चुकीवरून संतप्त झालेल्या विरोधकांनी शनिवारी (दि.१९) महासभेत जाब विचारत गोंधळ घातला. राष्टÑवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी थेट पीठासनावर जाऊन राजदंडाला हात घातला. त्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी सभेचे कामकाज गुंडाळून सभा संपवली.
नाशिक : महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात परिवहन समिती स्थापन करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात मात्र भाजपाच्या महापौरांनी बस कंपनी करण्याचा ठराव प्रशासनाला पाठविला. त्यामुळे इतिवृत्तातील चुकीवरून संतप्त झालेल्या विरोधकांनी शनिवारी (दि.१९) महासभेत जाब विचारत गोंधळ घातला. राष्टÑवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी थेट पीठासनावर जाऊन राजदंडाला हात घातला. त्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी सभेचे कामकाज गुंडाळून सभा संपवली. या सभेनंतर विरोधकांनी प्रतिसभा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु गोंधळ मॅनेज असल्याचा आरोप कॉँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी केल्याने गजानन शेलार आणि त्यांच्यात खडाजंगी झाली आणि ही प्रतिसभाही गुंडाळली गेली.
महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यात त्यांनी बस कंपनी स्थापन करण्याची तरतूद प्रस्तावित केली होती. परंतु सत्तारूढ भाजपाने बस कंपनीऐवजी परिवहन समिती स्थापन करावी तीच कायद्यात तरतूद आहे, असे त्यावेळी नमूद केले आणि महापौर रंजना भानसी यांनी तशी घोषणाही केली होती. त्यावेळी कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि मनसेने बससेवेलाच विरोध केला होता. परंतु यांसदर्भातील कोणतीही नोंद त्या सभेत घेण्यात आली नाही. सप्टेंबर महिन्याचे इतिवृत्त शनिवारी (दि.१९) महासभेत मंजुरीसाठी मांडण्यात आले होेते. दुपारी बारा वाजता सभेचे कामकाज सुरू होताच राष्टÑवादीचे गजानन शेलार यांनी इतिवृत्त मंजुरीच्या विषयाला आक्षेप घेतला आणि आपण दिलेले पत्र वाचून दाखवण्यास सांगितले. महापौरांनी त्यांना दाद न देताच खाली बसण्यास सांगितले. यामुळे शेलार अधीकच आक्रमक झाले आणि त्यांनी अशाप्रकारचे काम चालणार नाही, असे सांगत पीठासनावर धाव घेतल्याने गोंधळ सुरू झाला.
महापौर रंजना भानसी यांनी त्यांना पीठासनावरून खाली जाण्यास सांगितले, परंतु ते खाली तर उतरले नाहीत उलट राजदंडालाच हात घातला आणि तो पळवण्याची तयारी केल्याने महापौरांचा नाईक धावला आणि राजदंड पकडला. गदारोळ सुरू झाल्याने महापौरांनी तातडीने सर्व विषय मंजूर झाल्याचे जाहीर करून सभा गुंडाळली.
तीन महत्त्वपूर्ण विषयांवर स्वतंत्र चर्चामहापालिकेच्या मिळकती भाड्याने देण्याचे सर्वाधिकार आयुक्तांना देणे, मखमलाबाद शिवारात हरित क्षेत्र विकास करण्यासाठी इरादा जाहीर करणे तसेच महापालिकेच्या शाळांमध्ये अक्षयपात्र योजनेची अंमलबजावणी करणे हे तीन विषय वगळता महापौर रंजना भानसी यांनी सर्व विषय मंजूर केल्याचे जाहीर केले. या विषयांवर स्वतंत्र महासभा घेण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले. त्यामुळे आता या विषयांसाठी पुढील महासभेची वाट पहावी लागणार आहे.
सेना ‘रामायण’वर, महापौर लग्नाला!
महापालिकेच्या महासभेत झालेल्या गदारोळानंतर शिवसेनेचे सर्व नगरसेवक विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली महापौरांना भेटण्यासाठी गेले आणि कामकाज योग्य पद्धतीने होत नाही, तसेच परिवहन समितीचा ठराव झाला असताना बस कंपनीचा ठराव प्रशासनाकडे का पाठविण्यात आला, याची चौकशी करण्यासाठी गेले. परंतु महापौर आणि भाजपाचे सर्व पदाधिकारी गायब होते. एका लग्न सोहळ्यासाठी ते गेल्याचे सांगण्यात आले.