कळवण : चणकापूर उजव्या कालव्यातून मानूरसाठी बिगर सिंचनासाठी चार दलघफू पाणी देणे शक्य असल्याचा अहवाल गिरणा नदी खोरे प्रकल्प विभाग, नाशिकचे जिल्हाधिकारी कुशावह यांच्याकडे सादर केलेला असताना पाणी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीला प्रशासकीय यंत्रणेने चाप बसवल्याने मंगळवारी चणकापूर उजव्या कालव्यातून चार दलघफू पाणी मानूरकरांना मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.चणकापूर उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशावह यांनी दिल्यानंतर पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता पाटील यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या गावांना चणकापूर उजव्या कालव्यातून पाणी न पोहोचल्याने आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या उपस्थितीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना नियोजनाप्रमाणे पाणी वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या.दरवर्षी जिल्हाधिकारी यांच्याकडून मानूर गावासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण होते. मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभार व हलगर्जीपणामुळे तीन वर्षांपासून पाणी मिळत नसल्याने गेल्या २५ फेब्रुवारीला मानूरकरांवर आंदोलन करण्याची वेळ आली होती.चार दलघफू पाणी देण्याचा लेखी आदेश असूनही मानूर गावातील बंधारा पाण्याने न भरल्यामुळे मानूर येथील नागरिकांनी पंचायत समितीचे उपसभापती अॅड. संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अनिल पुरे यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. पोलीस निरीक्षक मधुकर गावित, पाटबंधारे विभाग सहायक अभियंता ए. बी. करनाळे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत मानूर येथील नागरिकांनी आमचे चार दलघफू पाणी का देत नाहीत व आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळावे म्हणून मागणी केली होती . शिवाय पाटबंधारे विभाग आपली फसवणूक करत असल्याचा आरोप करून मानूरकरांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ््यांच्या मनमानीला कारभाराची चौकशीची मागणी केली होती.यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखविण्याचा प्रकार समोर आला होता. तहसीलदार अनिल पुरे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना भेंडी येथे पाणी दिले गेले मग मानूर येथे पाणी का दिले जात नाही असा जाब विचारु न यंत्रणेला धारेवर धरले होते यावेळी सहाय्यक अभियंता करनाळे यांनी तो विभाग आपल्या अंतर्गत येत नसल्याचे सांगून मानूरसाठी ४ दशलक्षघनफूट पाणी आरिक्षत करण्यात आल्याचे बैठकीत सांगितले होते.मानूरसाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक वेळी पाणी आरक्षित होते. मानूर ग्रामपंचायतीने पाणीपट्टी भरलेली असूनही मानूर गावाला पाणी मिळालेले नाही त्यामुळे पाटबंधारे विभागाने आपली फसवणूक केल्याचे ग्रामस्थांनी बैठकीत सांगितले होते, त्यामुळे पाटबंधारे विभागावरील विश्वास उडाल्याचे सांगून पाणी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती, मानूर येथील नागरिकांनी शासनाचा निषेध नोंदवत वेळ आली तर हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे सांगून बैठकीतून काढता पाय घेतला होता व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी केली होती . (वार्ताहर)
मानूर ग्रामस्थांना मिळाले पाणी
By admin | Published: March 01, 2016 11:32 PM