नाशिक : शहर व परिसरात रविवारी (दि.१४) तब्बल ५९ नवे कोरानाबाधित रूग्ण आढळून आले. शहराचा बाधितांचा आकडा हा ६७३ वर पोहचला आहे. जुन्या नाशकात आज पुन्हा नवे १९ रूग्ण आढळून आले. वडाळागावात मागील आठवडाभरापासून नवीन रूग्ण आढळून येत नव्हते; मात्र रविवारी पुन्हा वडाळागावात तीन नवे रूग्ण पॉसिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात रविवारी एकूण ९२ रुग्ण आढळून आले. ग्रामिण भागातील ३३ रूग्णांचा यामध्ये समावेश आहे. नाशिक महापालिका हद्दीतील जुन्या नाशकातील चौक मंडई येथील एका ७३वर्षीय कोरोनाबाधित वृध्दाचा रविवारी मृत्यू झाला. महापालिका हद्दीत आतापर्यंत एकूण ३२ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. २३२ रुग्ण उपचारादरम्यान ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या उपचारार्थ ४०९ रुग्ण दाखल आहेत.कोरोनाबाधित रूग्णांची संख्या शहर व परिसरात झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे आता महापालिका, पोलीस प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकीकडे ‘अनलॉक’ करण्यात येत असताना दुसरीकडे मात्र कोरोनाचे संक्रमण ‘लॉक’ होण्याचे नावच घेत नसल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. सध्याच्या घडीला महापालिका प्रशासनाची पंचवटीमधील पेठरोड, जुने नाशिक आणि वडाळागाव ही मोठी डोकेदुखी ठरत आहेत. या भागात कोरोनाबाधितांची संख्या अद्यापही नियंत्रणात येत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जुने नाशिककरांनी पुढे येत सोशलमिडियावरून सोमवारपासून पुढील तीन दिवस स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याबाबतचे आवाहन करणारा लघुसंदेश व्हायरल केला आहे; मात्र या आवाहनला परिसरातील रहिवाशांकडून कितपत प्रतिसाद मिळतो, ते सोमवारी स्पष्ट होईल. कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी जुने नाशिककरांचा ‘जनता कर्फ्यू’ हा खूपच आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. या अनुषंगाने सोशलमिडियावर रविवारी सकाळपासूनच एक जनजागृतीपर आवाहन करणारा लघुसंदेश फिरत होता. कारण आतापर्यंत कोरोनाने सर्वाधिक मृत्यू शहरात जुन्या नाशकात झाले आहे. त्यामुळे जुने नाशिक भागातील वाढता कोरोनाचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी महपाालिका प्रशासनासोबत नागरिकांनाही तितकेच प्रयत्न करावे लागणार आहे. तसेच पेठरोडवरील पंचवटी भागातील नागरिकांनीसुध्दा संक्रमण टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला पाहिजे, असे वैद्यकिय सुत्रांचे म्हणणे आहे. पंचवटी, पेठरोड, जुने नाशिक, वडाळागाव हा सगळा गावठाणचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील जीवनशैली, दाट लोकवस्ती यामुळे या परिसरात कोरोनाचा धोका अधिक वाढत आहे.शहरात आज नव्याने जुने नाशिकमधील नाईकवडीपुरा, कथडा, बागवानपुरा, हमालपुरा, फाळके २ोड, खडकाळी, आझाद चौक, वडाळानाका या भागातील मिळून १९ रूग्ण मिळाले. यामध्ये वडाळानाका येथे सर्वाधिक ७ रूग्ण आहेत. तसेच वडाळागाव-३, वडाळारोड-१, भाभानगर-१, भारतनगर-१ पखालरोड-४, पेठरोड- ५, पाथर्डीफाटा-१, गंगापूररोड-१, कामटवाडे-१, हिरावाडी- ४, पेठकर प्लाझा, पंचवटी-१, मखमलाबादरोड-१, सातपूर-१, शिवाजीनगर-१, बिटको कॉलेज परिसर-१, त्रिमुर्तीनगर- ३, पोलीस मुख्यालय वसाहत-३, उत्तमनगर-१, नाशिकरोड-१, लॅमरोड-१, गोसावीनगर-१ असे रूग्ण आढळून आले आहेत.