सिन्नर : शेतकरी कर्जमाफीचे खोटे आकडे मुख्यमंत्र्यांकडून सांगितले जात आहेत. आजही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बजेटमध्ये कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. एससी-एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे कर्जमाफीसाठी पळविल्याचा आरोप प्रा. सुषमा अंधारे यांनी केला. येथील वावीवेस परिसरात महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानप्रसंगी त्या बोलत होत्या. देशात कॉँग्रेस आणि भाजपा यांनी सत्ता उपभोगली, मात्र दोन्ही पक्षांची विचारधारा भांडवलवादी आहे. त्यामुळे जनतेकडे दुर्लक्ष होते. व्यासपीठावर माजी आमदार माणिकराव कोकाटे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, अमोल पगारे, नारायण गायकवाड, तालुकाध्यक्ष मंगेश जाधव, डी. डी. गोर्डे, भाजपाचे शहराध्यक्ष पंकज जाधव, कृष्णा कासार, प्रवीण वर्मा, देवा जाधव, आशा जाधव, कल्पना रणशेवरे, महेंद्र उन्हवणे आदी उपस्थित होते. सर्वसामान्यांचे नेतृत्व उभे राहण्यासाठी देशासह राज्याच्या राजकारणात तिसºया पर्यायाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रा. अंधारे यांनी केले. देशासह राज्यात तीन वर्षं यशस्वी कारभार केल्याचा दावा भाजपा सरकारकडून केला जात आहे. मात्र, सर्वाधिक मोर्चे याच काळात निघाल्याकडे सत्ताधारी डोळेझाक करीत आहेत. शेतकरी संपदेखील भाजपाच्या काळात झाला. मुख्यमंत्र्यांना जनतेचे प्रश्न कळत नसल्याचा टोला प्रा. अंधारे यांनी लगावला.
राज्यातील अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:15 AM