ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा भयंकर विषाणू आढळल्याने तेथील विमान सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरदेखील ब्रिटनमधून राज्याच्या विविध भागात गेलेल्या प्रवाशांची पुन्हा चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुरुवारी (दि.२४) शासनाने नाशिक जिल्ह्यात २५ नोव्हेंबरपासून आलेल्या ६८ प्रवाशांची यादी महापालिकेला पाठवली होती. त्यातील ४८ प्रवासी नाशिक शहरातील आहेत, तर उर्वरित ग्रामीण भागातील आहेत. हे सर्व कोरोना निगेटिव्ह असल्याने चाचणी केल्यानंतरच शहरात आणि जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मात्र, त्यानंतरही शासनाचे आदेश असल्याने प्रत्येकाची आरोग्य तपासणी करून संशयितांनीचा शोध घेऊन प्रत्येकाची पु्न्हा कोरोना चाचणी करण्याचे आदेश आहेत. मात्र, महापालिकेने ब्रिटनहून आलेल्या सर्वांचीच चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक शहरात विभागनिहाय या नागरिकांचे पत्ते शोधून त्यांना जवळच्या रुग्णालयात अथवा फीव्हर क्लिनिकमध्ये त्यांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.२५) सुमारे वीस नागरिकांच्या तपासण्या झाल्या असून आता आणखी काही नागरिकांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. अनेक नागरिक हे सहकुटुंब ब्रिटनमधून आल्याने एकेका घरात अनेकजण सापडले आहेत. मात्र, आणखी सुमारे पंधरा ते वीस जणांचे पत्ते अयोग्य आणि फोनही लागत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे.
कोट...शासनाने पाठवलेल्या प्रवासी यादीतील सुमारे पंधरा ते वीस जणांचे पत्ते आढळत नाही किंवा ४४ या क्रमांकाने सुरू होणारे फोन लागत नाही. त्यांचा शोध सुरू आहे. सर्वच जण कोरोना चाचणी करून निगेटिव्ह आल्यानंतरच ते शहरात दाखल झाल्याने तसे अडचणीचे कारण नाही.
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, मनपा
कोट..
शासनाच्या सुधारित यादीनुसार प्रवाशांचे पत्ते शोधून त्यांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे. दिवसभरात सुमारे वीस जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल उद्या प्राप्त होतील. केवळ आरोग्य तपासणी न करता सर्वांचेच स्वॅब घेण्यात येणार आहेत.
- डॉ. आवेश पलोड, कोरोना सेलप्रमुख
इन्फो...
प्रत्येक जण २८ दिवसांच्या निगराणी खाली
नाशिक शहरात गेल्या २५ नोव्हेंबरपासून आलेल्या ब्रिटनमधील प्रत्येक नागरिक हा २८ दिवसांपर्यंत निगराणीखाली ठेवण्याचे निर्देश आहेत. २८ दिवस हा विषाणूचा इन्क्युबेशन पिरिएड असल्याने ब्रिटनमधून परत आल्यानंतर नाशिकमधील या वास्तव्याच्या कालावधीत आरोग्य निगराणी करण्यात येणार आहे.