नाशिक- गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत होत असलेली वाढ यामुळे गोदावरी नदीला हजारो क्यूसेस पाणी सोडण्यात येत असल्याने नदीच्या आजू बाजूच्या गावांना पाण्याने वेढले असून लहान मोठ्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुकीसाठी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून बंद करण्यात आला आहे. अनेक गावातील दळण वळणाचा संपर्क तुटल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
गंगापूर गोवर्धन गिरणारे वरील महादेवपूर जवळील पुलावरून पाणी जात असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव नाशिक तालुका पोलीस ठाण्याकडून बंद करण्यात आला. याठिकाणी रविवारमुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी तर दुसरीकडे काही कामानिमित्त ये जा करणार्यांचे हाल झाले.नाशिक - गंगापूर गोवर्धन पासून गिरणारे कडे जाणाऱ्यांना हॉटेल गम्मत जंमतीजवळ थांबविण्यात येत होते तर हरसुल- गिरणारे दुगाव पासून नाशिकच्या दिशेने येतांना महादेवपूर जवळील पाटाच्या जवळ थांबविले जात होते. तसेच गंगापूर आणि जलालपूर ला जोडणार्या पुलावरून पाणी जात असल्याने दोन्ही गावांचा संपर्क व रहदारी बंद करण्यात अली होती. गंगापूर गावातील धबधबा जवळील पूलही पाण्याखाली गेल्याने गंगापूर आंबेडकरनगर जलालपूर यांचा संपर्क व वाहतुकीला बंद झाला होता. आंबेडकर नगर मधील नागरिकांना चांदशी रोड मार्गे आनंदवल्ली वरून नाशिक ला जात येत होते. गंगापूर गावातील धबधब्यावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने पोलिसांना नियंत्रण करण्यासाठी यावे लागले . गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांनी बॅरेगेंटिंग केली होती.रविवारची सुट्टी असल्याने तसेच पुराचे पाणी पाहण्यासाठी गंगापूर गोवर्धन गावातील नागरिकांनी तसेच नाशिक हुन आलेल्या पर्यटकांनी एकच तोबा गर्दी केली होती. तीनचार दिवसापासून रात्रंदिवस सुरु असलेल्या पावसाने सर्व जण जीवन विस्कळीत झाले. गंगापूर गावातील अमरधाम पूर्ण पाण्याखाली बुडाला असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावे लागले. जिल्हापरिषदेची रानमळा गोवर्धन येथील अंगणवाडी पाण्याने भरून गेली. संपूर्ण परिसरात पाणीच पाणी झाले होते. जवाहर एजुकेशन ट्रस्ट चे विद्यालय पाण्याखाली गेले. परिसरातील शेतकर्यांच्या शेतात पाणी घुसल्याने तसेच रस्त्यावरून गुडघ्या एवढे पाणी वाहत असल्याने सर्व परिसर जलमय झाल्याचे चित्र दिसत होते. शेतकर्यांचे पिकाचे नुकसान झाल्याचे दिसत होते. हॉटेल गम्मत जम्मत येथील पूल पाण्याखाली गेल्याने काही हौशी पर्यटकांनी सेल्फी काढण्याचा मोह आवरता येत नव्हता तर दुसरी कडे नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना व त्यांच्या वाहनांना बाजूला करण्याचे काम करीत होते.