पेठ : दोन दिवसांपासून पेठ तालुक्याला पावसाने अक्षरश : झोडपून काढले असून, फरशी पूल पाण्याखाली गेल्यामुळे व घाटरस्त्यावर दरडी कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
करंजाळी ते हरसूल राज्य मार्गावर कोहोर परिसरात रस्त्यावर दरड कोसळली. उतारावरून झाडे, दगड व मातीचा मैला आल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. गुरुवारी सकाळी परिसरातील नागरिकांनी मदतकार्य करून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. पेठ ते हरसूल रस्त्यावरील भुवन घाटात दरवर्षी दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत असून याही वर्षी पहिल्याच पावसात भुवन घाटात दरड कोसळून भुवन,आंबापाणी, खडकी,धानपाडा, उम्रद, बोंडारमाळ, बोरपाडा, खामशेत आदी गावांचा संपर्क तुटला. पेठहून हरसूलला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणावर या मार्गावर रहदारी असल्याने प्रवाशांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागत आहे. भुवन घाटाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी भुवनच्या सरपंच रंजना दरोडे, धानपाड्याचे सरपंच रमेश दरोडे यांचेसह ग्रामस्थांनी केली आहे.
-------------------
फरशी पूल पाण्याखाली...
बुधवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे पेठ ते बाडगी, पेठ ते खंबाळे, पेठ ते जोगमोडी, पेठ ते संगमेश्वर, उम्रद ते बोंडारमाळ, बाडगी ते डेरापाडा, करंजाळी ते हरणगाव, भायगाव ते मानकापूर आदी रस्त्यावरील छोट्या फरशी पुलांवरून पुराचे पाणी गेल्याने वाहतूक खोळंबली होती, तर अनेक गावांतील रस्ते वाहून गेल्याने मुख्य गावांशी संपर्क तुटला आहे.
-----------------
असा झाला पाऊस
दि.२२ जुलैअखेर पेठ -३१५ मि.मी., जोगमोडी -२८० मि.मी., कोहोर -२७५ मि.मी., एकूण पाऊस -९७० मि.मी.
------------------
भुवन घाटात दरड कोसळल्याने ठप्प झालेली वाहतूक. (२२ भुवन)
220721\22nsk_8_22072021_13.jpg
२२ भूवन