लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जुन्या मुुंबई-आग्रा महामार्गावरील गडकरी चौक सिग्नलवर भरधाव स्कोडा कारने स्विफ्ट कारला दिलेल्या जबर धडकेत मायलेकींसह मुलीच्या मावशीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़ २६) पहाटेच्या सुमारास घडली़ सरिता लीलाधर भामरे (३५,रा़ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्वार्टर, जळगाव, मूळ रा़ मोराणे, ता़ जि़ धुळे), योगिनी लीलाधर भामरे (१९) व रेखा प्रकाश पाटील (३५, रा़ आंबिवली, मुंबई) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची महिलांची नावे आहेत़ तर लीलाधर भामरे हे गंभीर जखमी असून,त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील लिपिक लीलाधर भामरे हे पत्नी सरिता, मुलगी योगिनी व मुलीची मुंबई येथील मावशी रेखा पाटील यांच्यासमवेत दोन दिवसांपूर्वीच शहरातील सातपूर-अशोकनगरमधील जाधव संकुलमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांकडे आले होते़ शुक्रवारी (दि़ २६) पहाटेच्या सुमारास त्यांचे नातेवाईक व भामरे कुटुंबीय सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे दत्त मंदिरात दर्शनासाठी सातपूरहून निघाले़ पहाटे सव्वापाच वाजेच्या सुमारास गडकरी सिग्नलवर सारडा सर्कलकडून भरधाव आलेल्या स्कोडा सुपर्ब (एमएच ०१ एल ७९३१) कारने स्विफ्टला जोरदार धडक दिली़या धडकेत स्विफ्ट कारच्या डाव्या बाजूचा भाग दाबला जाऊन तिथे बसलेल्या योगिनी भामरे, सरिता भामरे, रेखा पाटील व लीलाधर भामरे यांना जबर मार लागला़ अपघातामुळे झालेल्या मोठ्या आवाजाने रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती देऊन जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ अपघातातील गंभीर जखमी योगिनी भामरे हिचा जागीच मृत्यू झाला होता तर सरिता भामरे व रेखा पाटील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला़ तर लीलाधर भामरे यांच्यावर उपचार सुरू आहेत़ तर स्विफ्ट कारचा चालक श्यामकुमार पाटील हा या अपघातातून बचावला आहे़
स्कोडाच्या धडकेत मायलेकीसह मावशी ठार
By admin | Published: May 27, 2017 1:22 AM