येवला : मराठा आरक्षण तात्काळ घोषित करण्यात यावे. येवला शहरात शिवसृष्टी निर्माण करण्यात यावी. पालखेड कालव्याचे पाणी वितरिका ४६ व ५२ ला सोडून तालुक्यातील सर्व बंधारे भरून देण्यात यावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांनी स्वीकारले. तसेच मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनादेखील समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.मराठा आरक्षण ९ आॅगस्टपर्यंत घोषित करण्यात यावे. तसेच शालेय विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात यावी तसेच येवला शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नसल्यामुळे मराठा समाजाची भावना दुखावली जात आहे. येवला शहराच्या इतिहासामध्ये प्रथमच राष्ट्रवादीचे विधानसभेचे आमदार, शिवसेनेचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार, शिवसेनेचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार व भाजपाचे नगराध्यक्ष असल्याने त्यांच्या माध्यमातून येवले शहरात सन २०१९ पर्यंत शिवसृष्टी निर्माण करावी. यासह विविध मागण्यासाठी ९ आॅगस्टपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनावर संजय सोमासे, देवीदास गुडघे, युवराज पाटोळे, सुधाकर पाटोळे, पंडित पवार, दत्तात्रय काळे, भाऊसाहेब जगताप, आदित्य नाईक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
येवल्यात मराठा समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:59 AM