नाशिक : अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत यावर्षी महत्वाचे बदल करण्यात आले असून यात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना १६ टक्के व आर्थिक मागास वर्गातील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण मिळणार आहे. परंतु, या आरक्षणामुळे संस्थांच्या इनहाऊस कोट्यावर थेट परीणाम होणार असून वाढलेल्या आरक्षणामुळे संस्थांच्या इनहाऊस क ोट्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. नाशिक महापालिका हद्दीतील ६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २३ हजार जागांसाठी मे महिन्याच्या उत्तरार्धात प्रवेश प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे शहरातील माध्यमिक व उच्च विद्यालयांसह कनिष्ठ महाविद्यालयांमधील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व प्राचार्यांची गुरुवारी (दि.९)रावसाहेब थोरात सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी अकरावी प्रवेश प्रक्रिया समन्वयक वैभव सरोदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शहरातील ६० महाविद्यालयांध्ये प्रवेश प्रक्रिया राबिली जाणार आहे. यात ४३ अनुदानित, ०४ विनाअनुदानित व १३ स्वयंअर्थसाह्य कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेच्या ४ हजार ८०० कॉमर्सच्या ७ हजार ७६०, विज्ञानच्या ९ हजार ५४० व संगणक विज्ञानच्या ५६० अशा एकूण २२ हजार ६६० जागा आहेत. अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी प्रभारी शिक्षण उपसंचालकांसह शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी कामाला लागले आहेत. प्रवेश प्रक्रियेविषयी विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती देण्यासाठी २० ते ३० मे पर्यंत शाळास्तरावर मेळावे घेण्यात येणार आहे. महानगरपालिक ा परिसरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये सुविधा केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मार्गदर्शनासाठी पूर्णवेळ सहायक आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शहरात ठिकठिकाणी मार्गदर्शन केंदे्र सुरू करण्यात येणार आहेत. झोननुसार वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांना त्या भागाशी संबंधित केंद्रात प्रवेशप्रक्रियेसाठी माहिती उपलब्ध होणार आहे. दरम्यान, शहरातील विद्यार्थ्यांना या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेविषयीची सर्व माहिती त्यांच्या शाळांमध्येच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मार्गदर्शन केंद्रांवर आवश्यकता भासल्यासच संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले असून शिक्षण उपसंचालक कार्यालयात प्रवेश प्रक्रिया समन्वयकांसह प्रवेश प्रक्रियेचा अनुभव असलेला पूर्णवेळ सहायक मानधन तत्वावर नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांनी दिली.