नाशिक : बालभवन सानेगुरुजी कथामालेतर्फे शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या पोवाडा स्पर्धेत मराठा हायस्कूलने बाजी मारली आहे. पाचवी व सहावी आणि सातवी व आठवी अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली असून या दोन्ही गटांत मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक पटकावले आहे.बालभवन सानेगुरुजी कथामालेतर्फे परशुराम साइखेडकर नाट्यगृहात आयोजित पोवाडा गायन स्पर्धेेचे परीक्षण शाहीर प्रवीण जाधव यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्रातील लोककलांविषयी मार्गदर्शन केले. महाराष्ट्राची संस्कृती व लोककला जिवंत ठेवण्याचे काम शाहिरीच्या माध्यमातून व अनेक पोवड्यातून आजही होत असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेत पाचवी ते आठवीचे विद्यार्थी यात सहभागी होते. मान्यवरांचा सत्कार वस्तुसंग्रहालय सचिव देवदत्त जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर बालभवन प्रमुख संजय करंजकर, सदस्य प्रकाश वैद्य, श्याम दशपुते, सुनील बस्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सविता कुशारे यांनी केले. स्पर्धकांनी शिवाजी महाराजाच्या वेशभूषेत प्रात्यक्षिकांसह पोवाडे सादर केले. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.मराठा हायस्कूल प्रथमबालभवनतर्फे घेण्यात आलेल्या पोवाडा स्पर्धेत पाचवी व सहावीच्या गटात मराठा हायस्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर शिशुविहार व बालकमंदिर विद्यालयांने द्वितीय व स्वामी विवेकानंद विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला असून, डी. डी. बिटको बॉइज हायस्कूलला उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले, तर सातवी व आठवी गटांतही मराठा हायस्कूलच्याच विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, न्यू इरा इंग्लिश स्कूल द्वितीय व सिडीओ मेरी तृतीय क्रमांक पटकावला आहे.
पोवाडा गायन स्पर्धेत मराठा हायस्कूलची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:33 AM