नाशिक : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या वतीने बुधवारी (दि़२५) पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये नाशिकरोडला आठ-दहा दुकाने व बँकेच्या एटीएमची तोडफोड, गंगापूर धरणावर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेस प्रतीकात्मक जलसमाधी, विविध ठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी रस्त्यावर पेटते टायर फेकून आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवणे पसंत केले तर बहुतांशी शाळांनी सुट्या दिल्या होत्या़ त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, सायंकाळी आंदोलन स्थगित केल्याचे समन्वय समितीच्या वतीने घोषित करण्यात आले़ मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे़ या आंदोलनाचा एक भाग म्हणून बुधवारी नाशिक बंदचे आवाहन करण्यात आले होते़ सकाळपासूनच शहरात शांततेत सुरूवात झाली असली तरी अनेक ठिकाणी बाजारपेठा काही प्रमाणात सुरू होत्या. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी दुकाने बंदचे आवाहन केल्यानंतर बाजारपेठा आणि व्यापारी संकुले बंद करण्यात आली. नाशिकरोडच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांनी एकत्र येत मुख्यमंत्र्यांच्या निषधार्थ घोषणाबाजी करून रॅली काढल्याने रेल्वेस्थानक व सुभाषरोडवरील दुकानदारांनी दुकाने बंद केली होती़शहरात एकूण २४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईशहर परिसरात आंदोलन करणाऱ्या एकूण २४ जणांवर पोलिसांनी प्र्रतिबंधात्मक कारवाई करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. गंगापूर धरणावर आंदोलन करणाºया ९ जणांना ताब्यात घेण्यात आले तर नाशिकरोडला उग्र आंदोलन करणाºया १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.दोन हजार पोलिसांचा बंदोबस्तशहरात सुमारे दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता़ ठिकठिकाणी नाकाबंदी करीत वाहनांची तपासणीही केली जात होती़ शहरातील शालिमार चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, रामकुंड, गाडगे महाराज पूल, कन्नमवार पूल, जुने नाशिक या परिसरात विशेष दक्षता घेण्यात आली होती.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आंदोलक रस्त्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:48 AM