नाशिक : मराठा आरक्षणावरील स्थगिती तात्काळ उठविण्यासाठी जलद गतीने प्रयत्न व्हावेत, तसेच मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारने अधिक गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करून सोमवारी(दि.५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अंमलबजावणीला स्थगिती दिल्याने मराठा समाजात अस्वस्थता निर्माण झाली असून स्थागित उठविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करन्याच्या मागणीसह एसईबीसी प्रवर्गातून शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज केलेल्या मराठा विद्यार्थ्यांची हानी टाळण्यासाठी राज्य सरकारने आपल्या नियंत्रणाखालील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये १२ टक्के जागा मराठा विद्यार्थ्यासाठी वाढविणे, मराठा आरक्षणास स्थगिती असे पर्यंत पोलीस भरती व इतर कोणतीही नोकर भरती करू नये, आरक्षणावरील स्थगिती उठल्याशिवाय एमपीएससीच्या परीक्षा घेऊ नये, कोपर्डी अत्याचार घटनेतील आरोपींवरील मुंबई उच्च न्यायालयातील खटल्याचे कामकाज जलद गतीने सुरू करावे, केंद्र सरकारने मराठा आरक्षणास संरक्षण देण्यासाठी संसदेत स्वतंत्र कायदा संमत करून घेणे, सर्वोच्च न्यायालयात घटनापीठ स्थापन करण्यासाठी आग्रही पाठपुरावा करून मराठा आरक्षणावरील स्थगिती शक्य तितक्या लवकर उठविण्यासाठी प्रयत्न करावे आदी मागण्यासाठी सोमवारी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.