लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नाशिक जिल्ह्यात बुधवारी विविध ठिकाणी सकल मराठा समाजातर्फे बंद पाळण्यात आला. या बंदला सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चांदवड, येवला, नांदगाव, दिंडेार, जळगाव नेऊर आदी ठिकाणी बंद पाळण्यात आला.
चांदवड येथे मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला. तर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत मराठा बांधवांनी जमून पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन दिले. सकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कैलास कडलग व तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनाही निवेदन देण्यात आले.
येवला व जळगाव नेऊर येथील सर्व व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभागी होत जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला. शासनाने लवकरात लवकर अधिवेशन बोलून तात्काळ अंमलबजावणी करावी असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार दिंडोरीत बंद होते. सकल मराठा समाजाच्या वतीने शासनाने आंदोलनाची दखल घेत त्वरित सगे सोयरे कायदा पारित करावा अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय नांदगाव येथेही बंद पाळला गेला.