नाशिक : मराठा आरक्षण व औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे या तरुणाने घेतलेल्या जलसमाधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चा तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने शहर आणि ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. सिन्नर शहरातील बाजारपेठ शंभर टक्के बंद होती. मराठा समाज बांधवांनी पिंपळगाव बसवंत, त्र्यंबकेश्वर, अंदरसूल येथे मोर्चा काढून तहसीलदारांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली. सिन्नर : येथील हुतात्मा स्मारकात सकाळी १० वाजता मराठा समाज बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत निवेदन तयार करण्यात येऊन तहसीलदारांना देण्याचे ठरले. माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, नगरसेवक गोविंद लोखंडे, बाळासाहेब उगले, प्रा. आर.के. मुंगसे, नामदेव कोतवाल, पंकज जाधव, कृष्णा कासार, हरिभाऊ तांबे, राजाराम मुरकुटे, योगेश वर्पे, पांडुरंग वारुंगसे, सोमनाथ भिसे, हर्षद देशमुख, राजेंद्र घोरपडे, भाऊसाहेब शेळके, संजय कोतवाल यांच्यासह शेकडो मराठा समाज बांधवांनी शहरातून मोर्चा काढला.बसस्थानक, गावठा, गणेश पेठेतून शिवाजी चौकातून मोर्चा तहसील कार्यालयाकडे गेला. यात तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रस्त्यात बंदचे आवाहन करण्यात येत होते. त्यानुसार शहरातील व्यावसायिकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. मोर्चा तहसील कार्यालयात गेल्यानंतर तहसीलदार नितीन गवळी व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली. मेगा भरतीपूर्वी आरक्षणाची घोषणा अंमलात आणावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.मागासवर्गीय आयोगाला विविध पुरावे देण्यात आले आहेत, मात्र शासन वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. याच वर्षापासून शैक्षणिक व सेवा क्षेत्रातील आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. सरकारने स्थापन केलेल्या मराठा समाजासाठीच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास भरीव निधीची तरतूद करावी, आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी, अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाकडे सादर करण्यात आले. त्यानंतर पुन्हा शहरातील विविध भागात फिरून बंदचे आवाहन करण्यात आले. एक मराठा, लाख मराठा आदींसह विविध घोषणा देत तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली.शहरातून मोर्चा काढल्यानंतर आडवा फाटा येथे शोकसभा घेण्यात आली. आरक्षणासाठी बलिदान देणारे काकासाहेब शिंदे यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ तांबे यांच्यासह पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, शहरात दिवसभर कडकडीत शांततेत बंद पाळण्यात आला.पिंपळगाव बसवंतला रास्ता रोकोपिंपळगाव बसवंत : मुंबई-आग्रा महामार्गावर मराठा समाज बांधवांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाट्याजवळ रास्ता रोको केला. सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पिंपळगाव बसवंत पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांना मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी निवेदन दिले. यावेळी कोकणगाव फाटा परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने तैनात करण्यात आला होता. या ठिकाणी कोकणगाव, शिरसगाव, साकोरे मिग, वडाळीनजीक या गावातील नागरिक उपस्थित होते. तसेच शिरवाडे फाटा येथेही याच मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांना देण्यात आले. पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे याच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर कोकणगाव, शिरवाडे वणीत कडकडीत बंद पाळण्यात आला होता.झोडगे येथे गावबंद आंदोलनंझोडगे : येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गावबंद आंदोलन करण्यात आले. गोदावरी नदीत जलसमाधी घेतलेल्या कायगाव येथील काकासाहेब शिंदे यांना ग्रामस्थांनी श्रद्धांजली अर्पण केली. झोडगेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील व्यापारी संकुल बंद होते. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.नायब तहसीलदारांना ग्रामस्थांचे निवेदनपिंपळगाव (दा.) : पिंपळगाव (दाभाडी) येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आज तहसील कार्यालयात नायब तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शिष्टमंडळात शेखर पवार, विष्णू पवार, नितीन पवार, मिलिंद पवार, अनुप पवार, गणेश हिरे, सागर पवार, बळी पवार आणि पिंपळगाव (दा.) येथील बहुसंख्य तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते.
मराठा आरक्षण : जिल्ह्यात मोर्चे; कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:17 AM