नाशिक - कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या' मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. ज्यांच्या जन्म दिवसानिमित्त महाराष्ट्रभर मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो, त्या कवी कुलगुरू कुसुमाग्रजांच्या जयंती दिनी नाशिकच्या महापौरांनी चक्क श्रद्धांजली अर्पण केली.
मंगळवारी (27 फेब्रुवारी) सकाळी 9 वाजता कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयात अभिवादानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नाशिक महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कार्यक्रम स्थळी महापौर 2 तास विलंबाने पोहोचल्या आणि कुसुमाग्रजांना श्रद्धांजली अर्पण करून मोकळ्या झाल्या. अन्य पदाधिकाऱ्यांनी सुधारणा केल्यानंतर माध्यम प्रतिनिधींना दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले दरम्यान प्रतिष्ठानच्या कारभाऱ्यांची देखील उदासीनता दिसून आली. सोमवारी रात्री येथे विद्युत रोषणाई अपेक्षित असताना आजही रोषणाई केलेली नव्हती.