शिरवाडे वणी : निफाड तालुक्यासह शिरवाडे वणी परिसरात ऑक्टोबर महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षाच्या काढणीला वेग आला असून, प्रतिवर्षाच्या तुलनेत या वर्षी द्राक्षाचे बाजारभाव कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त दिसून येत आहे.निफाड तालुक्याचा उत्तर-पूर्व भाग हा द्राक्ष उत्पादन निर्मितीमध्ये अग्रेसर असून, द्राक्षाचे पीक हे प्रमुख नगदी पीक व परकीय चलन मिळवून देणारे एक असले तरी सध्याच्या मिळत असलेल्या कोसळत्या बाजारभावामुळे आता ते भरवशाचे पीक राहिले नाही. परिसरातून स्थानिक बाजारपेठेपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये शेतकरी तसेच व्यापारी द्राक्षे पाठविण्याचे काम करीत असतात. मागील वर्षी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर खर्च अधिक व उत्पादन शून्य झाले असून, यावर्षीसुद्धा ह्ययेरे माझ्या मागल्याह्ण अशी परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे.सद्य:स्थितीत स्थानिक बाजारपेठाअंतर्गत द्राक्षाला २० ते २५ रुपयांपर्यंत भाव मिळत असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठअंतर्गत निर्यातक्षम प्रतीच्या द्राक्षाला ३० ते ४० रुपयांपर्यंत इतकाच भाव मिळत असल्यामुळे त्यापासून मिळणारे उत्पन्न हे खर्च वजा जाता काहीच नसल्यामुळे तसेच द्राक्षपीक हे दिवसेंदिवस मजुरीचे वाढते दर, औषधे व खतांचे खर्च यामुळे अतिशय खर्चिक होत आहे.त्यामुळे खर्चाच्या तुलनेत हे पीक परवडेनासे झाले आहे. गेल्या पाच वर्षांच्या मागील कालखंडाकडे दृष्टिक्षेप टाकला असता द्राक्षांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या भरवशावर बँक, सोसायटी, सावकारी कर्ज, पतपेढी यांचे कर्ज खासगी हातउसने पैसे उचलले असताना ते परतफेडीसाठी भरवशाचे पीक मानले जात होते; परंतु दिवसेंदिवस गारपीट, अवेळी पाऊस, बदलत्या हवामानाचे दुष्परिणाम व कोसळत्या बाजारभावाचा परिणाम यांमुळे आता तरी द्राक्ष उत्पादक हातघाईस आलेला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या डोक्यावर वाढलेला बोजा वाढतच चालला असून, प्रत्येक वर्षी द्राक्षशेतीमध्ये लाखो रुपये खर्च करून नैराश्य पदरी पडत असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे.या बाबीतून सावरण्यासाठी तसेच शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व शेती व्यवसायाला गतवैभव प्राप्त होण्यासाठी स्थानिक पातळीपासून शासनापर्यंत आर्थिक बळ देणे गरजेचे आहे. परिणामी अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतीव्यवसायाला नित्याचीच घरघर लागली आहे.
द्राक्षाचे दर कोसळल्याने उत्पादक चिंताग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 9:17 PM
शिरवाडे वणी : निफाड तालुक्यासह शिरवाडे वणी परिसरात ऑक्टोबर महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षाच्या काढणीला वेग आला असून, प्रतिवर्षाच्या तुलनेत या वर्षी द्राक्षाचे बाजारभाव कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त दिसून येत आहे.
ठळक मुद्देशेतीव्यवसायाला घरघर : खते, मजुरीच्या खर्चामुळे आर्थिक पेच