नाशिक : जु. स. रुंगटा हायस्कूल व पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयातर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त गुरुवारी (दि.२७) काव्य संमेलन रंगले. मराठी भाषेच्य गौरवाबरोबरच लेक वाचवण्यासारख्या सामाजिक विषयांचाही या निमत्ताने जागर करण्यात आला.
या कवी संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक कमलाकर देसले यांच्या हस्ते झाले. यावेळी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, घडामोडीविषयी प्रश्न पडणे हे प्रतिभेचे लक्षण असून, प्रत्येकाला असे प्रश्न पडले पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र विचार करणे आवश्यक असून अशा स्वतंत्र विचारातूनच चांगल्या विचारांची निर्मिती होत असल्याचे प्रतिपादन देसले यांनी केले. यावेळी मराठी राजभाषा दिन सोहळ्यातील मराठी काव्यसंमेलनात सहभागी कवींनी ‘लेकवा वाचवा, लेक शिकवा’ या संदेशावर भर देत सादर केलेल्या कवितांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली, यात कमलाकर देसले यांच्या ‘मी मराठी ,मला मराठीचा अभिमान आहे. ज्ञाना-तुकयाची मराठीच, माझा प्राण आहे’ या कवितेसह राजेंद्र शेळके यांनी सादर केलेली पुण्यवानाला इथे मिळतात ना लेकी, थेट स्वगार्तून अवतरतात ना लेकी, रवींद्र मालुंजकर यांची ‘लेक भूषणा भूषण, थेट प्रश्नाचे उत्तर’ अरुण इंगळे यांची ‘खूप शिकवं पोरी तू, असं लई मोठं व्हय, भोवतीच्या वादळाची, करू नको गय’ राजेंद्र उगले यांची ‘सत्यवानाचे प्राण आणण्या...गेली सावित्री स्वर्गात, फुलेंच्या या सावित्रीने, स्वर्ग शोधला वर्गात आदी कवितांना रसिकांची पसंती मिळाली.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी विजयकुमार मिठे होते तर नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अश्विनीकुमार येवला, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष मिलिंद कचोळे, विलास पूरकर, मुख्याध्यापक कवी दयाराम गिलाणकर, यशश्री कसरेकर आदी उपस्थित होते. यावेळी सुलभा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लोकसंस्कृती या हस्तलिखिताचे व मनोजकुमार शिंपी लिखित ‘मराठी भाषा क्षमता व कौशल्य विकास’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.---राजभाषा दिनाचे औचित्यमान्यवर कवींचा सहभाग