नाशिक : साहित्य संमेलनाची आखणी करताना आपल्याला राजाश्रय हवा असतो. शासनाने तो दिला पाहिजे, असेच माझे मत आहे. तुम्ही मंडळी राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन कथा, कादंबऱ्या रचत असता. वात्रटिकांसाठी राजकीय पुढाऱ्याइतका मसाला तुम्हाला कोणी पुरवत नाही. तरीसुद्धा साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकीय नेत्यांनी असू नये असे काहींना वाटते, ते उचित वाटत नाही. तुम्ही तुमचे स्वातंत्र्य अबाधित ठेवा. ‘राज्यकर्त्यांनो तुम्ही चुकता आहात’ हे सांगण्याचा तुमचा अधिकार आम्ही मान्य करतो, असे प्रतिपादन स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी उद्घाटन सोहळ्यात केले.
भुजबळ यांनी सांगितले, मी स्वतः लेखक नाही, पण वाचक आहे. पहिल्या दोन संमेलनात सहा दशकाचे अंतर पडलेले होते. त्यानंतर अवघ्या पंधरा-सोळा वर्षांत कुसुमाग्रज साहित्यनगरीत हे संमेलन होत आहे. नाशिक जगाच्या नकाशावर कुंभमेळ्यामुळे आले. आज साहित्यिकांच्या ज्ञान पर्वामुळे निदान भारताच्या आणि तंत्र क्रांतीमुळे जगाच्या नकाशावर दिसत असेल. मराठी ही भाषा अभिजात भाषा आहे. तिला २२५० वर्षांचा इतिहास असल्याचे शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित पोथ्यांचे शेकडो पुरावे प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्यांच्या अहवालात दिलेले आहेत. हा अहवाल भारत सरकारने नेमलेल्या सर्व भाषातज्ज्ञांनी तपासला आणि एकमताने तो उचलून धरला.
सेल्फी संमेलनहोणार की होणार नाही अशा अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखेर शुक्रवारपासून सुरू झाले. संमेलनासाठी नाशिककरांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र अगदी सकाळपासूनच दिसून आले. साहित्य क्षेत्रातील जाणकारांपासून ते हौशी लोकांची वर्दळ होती. त्यातही तरुणांचा विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्साह नजरेत भरणारा होता. संमेलनस्थळी उभारण्यात आलेल्या विविध शिल्पकृती, चित्रकृती पाहता पाहता कित्येक जण सेल्फी घेण्यात दंग झाले होते. संमेलनात होणाऱ्या विविध सत्रांमध्येही तरुणांचा असा लक्षणीय सहभाग दिसणार का याचीच उत्सुकता अनेक बुजुर्गांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती. नसता हे संमेलन म्हणजे तरुणांसाठी केवळ मौजमजा करण्यासाठीचा एक इव्हेंट ठरेल.
शाई लावा अन् आत जा...संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी प्रत्येकाला लसीकरणाचे प्रमाणपत्र विचारले जात होते. ते दाखवल्याशिवाय आत प्रवेशच दिला जात नव्हता. प्रमाणपत्र दाखवल्यावर उजव्या हाताच्या पहिल्या बोटावर शाई लावली जात होती. ते पाहून अनेकांना आपण जणू काही मतदानाच्या बूथवरच आहोत की काय असे वाटत होते. उजव्या बोटाची हिरवी शाई दाखवणारे सेल्फीही अनेकांनी उत्साहाच्या भरात टिपले. ही शाई लगेच पुसली गेली तर पुन्हा प्रवेश कसा मिळणार अशी शंका काहींनी तिथे विचारली, त्यावर शाई लावणारी स्वयंसेवक मुलगी चटदिशी उत्तरली, ‘त्यात काय एवढं, पुसली गेली शाई तर परत इकडे माझ्याकडे यायचं आणि पुन्हा बोटाला शाई लावून घ्यायची...!’
हौशी कवींची अशीही फिल्डिंग....संमेलनात सगळ्यात जास्त उत्साह असतो तो नवकवींचा.... नाशिकचे हे संमेलनही त्याला अपवाद नाही. तीन दिवस सलग चालणाऱ्या कविकट्ट्याकडे या हौशी कवींची ओढ असते. शुक्रवारी संध्याकाळी या कविकट्ट्याला सुरुवात झाली. मात्र, त्याआधीच अनेक कवींनी आपापली फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याचे दिसून आले. या कवींचे ग्रुपच्या ग्रुप संमेलनस्थळी फिरताना दिसले. या कवींच्या गप्पाही ऐकण्यासारख्या होत्या. ‘अरे, माझी कविता उद्या दुपारच्या सत्रात आहे. माझा तेव्हा फोटो काढशील आणि हो, दुसऱ्या मोबाइलमध्ये व्हिडिओ पण कर बरं का... म्हणजे लागलीच फेसबुकावर पोस्ट करता येईल...’ थोडक्यात काय तर, संमेलन होईलच, संमेलनावरून वादही होत राहतील... पण या हौशी कवींशिवाय संमेलनाला रंगत नाही हेच खरं...! - दुर्गेश सोनार
...तर पहिला विरोध करणारा मी असेन!मराठी साहित्य संमेलन हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू असलेला सोहळा आहे. त्याला सारस्वतांचा मेळा म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. साहित्य संमेलनात राजकारण आणि संमेलन याविषयी वेळोवेळी चर्चा होत आली आहे. १९४२च्या साहित्य संमेलनात ‘साहित्य आणि राजकारण वेगळे नाही’ याचा निर्वाळा आचार्य अत्रे यांनी दिला होता. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी १९६० सालीच साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ स्थापन करून साहित्य संवर्धन, ज्ञानसंवर्धन यांना गती दिल्याचे आपण जाणतो.लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलेच पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेन, अशी ग्वाहीही भुजबळ यांनी दिली.