- श्रीमंत माने(कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर)सालाबादप्रमाणे नाशिकच्याही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वादाचे रंग भरण्याचा प्रयत्न झालाच. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या नगरीत, जनस्थानात भरणाऱ्या या ९४व्या संमेलनाच्या खरे तर अनेक चांगल्या बाजू आहेत. डॉ. जयंत नारळीकरांच्या रूपाने वादातीत असे, वाचकप्रिय अन् सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शास्त्रज्ञ म्हणून जबाबदारी सांभाळतानाच मराठी साहित्यातही मोठे योगदान दिलेले विज्ञान लेखक गोदावरीकाठी भरणाऱ्या या साहित्यिकांच्या कुंभमेळ्याला संमेलनाध्यक्ष म्हणून लाभलेत. त्यांची किंवा अगदी रामदास भटकळ यांच्यासारख्या दिग्गज प्रकाशकांची मुलाखत बरेच काही देऊन जाईल, असा वाचकांना विश्वास आहे.
कोरोना महामारीच्या संकटाने झाकोळलेले हे संमेलन होईल तरी कधी, असा प्रश्न पडलेला असताना व बहुतेक रद्दच होते, असे वाटत असताना आयोजकांनी पुन्हा कंबर कसल्याने उशिरा का होईना ते पार पडत आहे. तरीदेखील संमेलन व वाद हा पायंडा काही मोडायचे नाव घेत नाही. त्यातही स्वागताध्यक्ष छगन भुजबळ व त्यांचे पुतणे, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह सहकाऱ्यांनी संमेलनासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे शेवटच्या टप्प्यात थोडे राजकीय आरोपही झाले. हे असे संमेलन असते का, वगैरे विचारणा होऊ लागली. तथापि, जे भुजबळांना ओळखतात त्यांना त्यांच्या शिक्षण संस्थेच्या आवारात मोठ्या थाटामाटात होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाविषयी फारसे आश्चर्य वाटणार नाही. जे काही करायचे ते जोरात, भव्य-दिव्य ही थोरल्या किंवा धाकट्या भुजबळांच्या कामाची पद्धतच आहे. भुजबळ कुटुंबावर ईडीचे संकट येण्यापूर्वीची चार-सहा वर्षे नाशिककरांना चांगलीच आठवणीत आहेत.
नाशिक फेस्टिव्हल नावाने असेच भव्य-दिव्य आयोजन ते करायचे. बॉलीवूडमधील मोठमोठे कलावंत यायचे, भुजबळांच्या आयोजन कौशल्याबद्दल लोक तोंडात बोटे घालायचे व तरीही हजारोंच्या संख्येने महाेत्सवाचा आनंद लुटायचे. महाराष्ट्र सदन प्रकरणाने भुजबळांवर संकट आले व फेस्टिव्हल बंद पडला. काका-पुतण्याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर राजकारण रंगले. लोकसभेला पुन्हा अपयश आले, पण विधानसभेत येवला ठाणे फत्ते झाले, नांदगावचा किल्ला मात्र पडला. राज्यात अनपेक्षितपणे महाविकास आघाडीची मोट बांधली गेली. राष्ट्रवादी सत्तेवर आली आणि २०२०च्या २८ नोव्हेंबरला तिन्ही पक्षांच्या दोन-दोनच मंत्र्यांनी शपथ घ्यायची होती तेव्हा जयंत पाटलांसोबत भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सरकारमधील बडे मंत्री व नाशिकचे पालकमंत्री म्हणून साहित्य संमेलनाच्या रूपाने भुजबळांना नाशिक फेस्टिव्हलच्या आठवणींना उजाळा देण्याची जणू संधी लाभलीय. खुद्द महात्मा जोतिराव फुल्यांनी दीडशे वर्षांपूर्वी घालमोड्या दादांचा मेळावा म्हणून संमेलनाला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. पण, तो झाला इतिहास. आताचा काळ वेगळा आहे. तेव्हा, लेखक, कवी, समीक्षक, विचारवंत अशी मंडळी एकत्र येत असल्याने नाशिकच्या संमेलनात धीरगंभीर चर्चा होईल खरे. चर्चेत मात्र संमेलनाची भव्यदिव्यताच राहील. त्याचे कारण, संमेलनाच्या रूपात हा खरे तर माय सरसोतीचा नाशिक फेस्टिव्हल आहे.