नाशिक : यंदा पाऊस चांगला झाला असल्याने जिल्ह्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि इतर कामांसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही. जायकवाडी धरणही भरले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून दरवर्षीप्रमाणे मराठवाड्याला देण्यात येणारे पाणी यंदा वाचणार असून, जिल्ह्यातील धरणाचे पाणी जिल्ह्यातच वापरण्यासाठी अधिकाऱ्यांनी आकस्मिक पाण्याचेही नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या आहेत.जिल्ह्यातील धरणाचे उपलब्ध पाण्याचे सिंचन, पिण्याचे तसेच औद्योगिक वापरण्यासाठी आरक्षण करण्यासाठी शनिवारी ( दि.१०) भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यावेळी भुजबळ पुढे म्हणाले, जिल्ह्यातील धरणाचे दारणा, चणकापूर, गंगापूर आणि पालखेड समूह असे चार विभाग केले जातात. यामध्ये मोठे प्रकल्प एकूण १५, मध्यम प्रकल्प ९, लघु प्रकल्प ७७ तर कोल्हापुर पध्दतीचे १२ बंधारे आहेत. जिल्ह्यासाठी ७५ हजार ८६६ द.ल.घ.फू पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. सध्या ७२ हजार ५८१ द.ल.घ.फू पाणीसाठा असून गेल्यावर्षी पेक्षा ४.३८ टक्के इतका पाणीसाठी कमी आहे. तसेच आरक्षित पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने व तालुकास्तरावरुन गटविकास अधिकारी यांनी आकस्मिक मागणी लवकरात लवकर कळवावी, अशी सूचनाही त्यांनी केली. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीकडून येणारी पाण्याची मागणी नोंदविण्यात यावी. तसेच आलेल्या मागणीनुसार पिण्याचे पाण्याचे आरक्षण करण्यात यावे. कुठेही पाण्याची कमतरता भासता कामा नये, यासाठी पाणी आरक्षणाचे नियोजन योग्यप्रकारे करावे असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, कार्यकारी अभियंता (पालखेड) राजेश गोवर्धने, मालेगांव कार्यकारी अभियंता एम.एस.चौधरी उपस्थित होते.मनपाला ५,५०० दलघफू पाणीमहापालिकेला साडेपाच हजार दसलक्ष घनफुट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यात गंगापूर ३ हजार ८०० द.ल.घ.फू, दारणा ४०० द.ल.घ.फू., मुकणे १ हजार ३०० द.ल.घ.फू. असे एकूण ५ हजार ५०० द.ल.घ.फू. इतके पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. तसेच मालेगाव महानगरपालिकेच्या मागणीनुसार चणकापूर धरणातून १३९९.८९ द.ल.घ.फू.पाणी आरक्षित करण्यात आले आहे.१५ हजार दलघफू एकूण मागणीनाशिक पाटबंधारे विभाग,पालखेड पाटबंधारे विभाग व मालेगांव पाटबंधारे विभाग या तीन विभागांची मिळून शासनमान्य आरक्षणनुसार १५ हजार २२० द.ल.घ.फू मागणी असून आकस्मिक मागणी ४ हजार ८९१ द.ल.घ.फू एवढी आहे. त्यात नाशिक महानगरपालिका, थर्मल पावर स्टेशन एकलहरे, सिन्नर एमआयडीसी, महाराष्ट्र औद्योगिक यांत्रिकी संशोधन केंद्र, येवला वाईन पार्क, पालखेड, मनमाड ग्रामपंचायत, येवला ग्रामपंचायत आणि मनमाड रेल्वेस्टेशन येथे मोठ्या प्रमाणावर पाणी आरक्षित करण्यात येते. चणकापूर मधून मालेगांव महानगरपालिका पाणी पुरवठा, सटाणा नगरपरिषद, दाभाडी ११ गाव पाणी पुरवठा या मुख्य योजना असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.