नितीन बोरसे, सटाणा, नाशिक : मणिपूर येथील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बागलाण तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीसह विविध आदिवासी, पुरोगामी समविचारी पक्ष-संघटनांच्यावतीने शनिवारी (दि.२९) दुपारी १२:३० वाजता तहसील कार्यालयावर अर्धनग्न माेर्चा नेण्यात आला. दरम्यान, मोर्चाची सांगता झाल्यानंतर एका टोळक्याने अचानक पाटील चौकात ठिय्या दिल्याने गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला असता टोळक्याने पोलिसांसह वाहनांवर दगडफेक केल्याने मोर्चाला गालबोट लागले.
पोलिसांनी धरपकड करत आयोजकांसह सुमारे ४० जणांना ताब्यात घेतले आहे. मणिपूर येथील हिंसाचारात आदिवासी महिलांवर झालेले अत्याचार आणि देशभरात आदिवासी, दलित, बौद्ध, अल्पसंख्याक या समुदायावर वाढलेल्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बागलाण तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीसह विविध आदिवासी संघटना, पुरोगामी समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर अर्धनग्न मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथून सुरू झालेला हा अर्धनग्न मोर्चा तहसील कार्यालयावर जाऊन धडकला. अगदी शांततेत हा मोर्चा तहसीलवर आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. सुमारे वीस ते पंचवीस हजार नागरिक या अर्धनग्न मोर्चात सामील झाले होते.
वाहनांची तोडफाेड
मोर्चाची सांगता झाल्यानंतर अचानक एका टोळक्याने पाटील चौकात ठिय्या दिल्याने एकच गोंधळ उडाला. या टोळक्याला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मात्र, टोळक्याने आक्रमक होत परिसरातील वाहनांवर तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. काहींनी नाशिक नाक्याकडे पळ काढत काही वाहनांवर दगडफेक करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. टोळक्याने सुमारे २५ ते ३० वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्काळ धरपकड सत्र सुरू करून आयोजकांसह सुमारे चाळीस जणांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.