लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मौजे खानगाव येथे तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर दीपावली सणानिमित्त झेंडू फुलांच्या लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे माजी सदस्य पोपटराव रायते व व्यापारी नंदू घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आला.
लासलगावसह परिसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी झेंडू ह्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. त्यांना मालविक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे झेंडू फुलांच्या लिलावास सुरूवात करण्यात आली. झेंडू उत्पादकांनी आपला माल योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा. वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्यात येणार आहे. झेंडू फुले खरेदीसाठी मोठ्या संख्येने खरेदीदार सहभागी होणार असल्याने स्पर्धात्मक बाजारभावामुळे योग्य दर मिळण्यास मदत होईल असे रायते यांनी सांगितले.
सुरूवातीस बापू खापरे, रा. शिवडी ह्या शेतकऱ्याचा मुहूर्ताचा झेंडू २१.५० रूपये प्रती किलो ह्या दराने मतीन अब्दुल हमीद शेख यांनी खरेदी केला. दिवसभरात ८,००० किलो झेंडू फुलांची आवक होऊन बाजारभाव कमीत कमी १५ रूपये, जास्तीत जास्त २८ रूपये तर, सरासरी २० रूपये याप्रमाणे होते. याप्रसंगी बाजार समितीचे व्यापारी उत्तमराव जाधव, बाबाजी बनकर, कृष्णा जाधव, नितीन जाधव, नितीन कापडी, रोशन जेऊघाले, सोपान रायते, प्रल्हाद डुंबरे, नवनाथ जेऊघाले, प्रभारी व्ही. बी वाघचौरे, तुषार शेजवळ, विक्रांत धाकराव यांचेसह शेतकरी, मदतनीस आदी उपस्थित होते.
--------------------