नाशिक : लक्ष्मीपूजनासह दिवाळी पाडव्यासाठी झेंडू आणि फुलांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी शुक्रवारी (दि. १३) बाजारात गर्दी केली होती. दसऱ्याला प्रचंड भाव आलेल्या झेंडूच्या फुलांना काल बाजारात शेकडा २०० रुपयांपर्यंत दर मिळाला. फूलबाजारात आणि दहीपूल परिसरात असलेला दोनशेचा दर उपनगरांतील बाजारपेठांमध्ये हाच दर २५० ते ३०० रुपये शेकडापर्यंत पोहोचला होता. दिवाळी सणासाठी लक्ष्मीपूजन, पाडव्यासाठी झेंडूच्या फुलांचे हार, तोरण, तसेच पूजेसाठी फुलांची आवश्यकता भासते. दसऱ्यापर्यंत कोरोनाचाच कहर मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांनी झेंडूची फारशी लागवडच केली नव्हती. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना हजार रुपये क्रेटपर्यंत दर पोहोचले होते. दसऱ्याला फुलांना फटका बसल्याने झेंडूची आवक होणार की नाही अशी भीतीदेखील होती. मात्र, आता फुलांची आवक चांगली झाली असून, पाडव्यापर्यंत आवक अजून वाढण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी झेंडूच्या फुलांचे हार ४० रुपयांपासून उपलब्ध होते. आदिवासी पाड्यांवरून विक्रेते दाखल होण्यास प्रारंभ झाल्याने दहीपुलापासून थेट गाडगेमहाराज पुलापर्यंतचा रस्ता फूलविक्रेत्यांनी गजबजून गेलेला आहे.
इन्फो
रस्त्यांवर वाहनांची गर्दी
शहरातील मुख्य बाजारपेठेत दुतर्फा विक्रेत्यांच्या हातगाड्या, पार्किंग केलेली वाहने लागलेली असल्याने त्या दोन्हींमधून वाट काढण्यासाठी वाहनधारकांना प्रचंड कष्ट घ्यावे लागत आहेत. मध्यवर्ती बाजारपेठेत तर काही क्षण वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याचे प्रकारदेखील घडत आहेत.