----
दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ
मालेगाव : घर बांधण्यासाठी माहेरून २ लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह चौघा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कल्याणी जयवंत सूर्यवंशी रा. लेंडाणे या विवाहितेने फिर्याद दिली आहे. पती जयवंत गोरख सूर्यवंशी, गोरख दगा सूर्यवंशी, हिरालाल गोरख सूर्यवंशी, प्रतीभा सुरेश पवार यांनी मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार बच्छाव करीत आहेत.
----
दुचाकीच्या धडकेत तरुण ठार
मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावर सौंदाणे शिवारात दुचाकी क्रमांक एमएच ४१ यू ८०९२ वरील चालक (नाव माहीत नाही) याने पायी चालणाऱ्या भाऊसाहेब बापू माळी (३०) या तरुणाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात माळी हे गंभीर जखमी होऊन मृत झाले. याप्रकरणी सोनू बारकू पवार यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात दुचाकी चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार तिडके हे करीत आहेत.
----
कार पलटी होऊन एक जण ठार
मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावर चंदनपुरी शिवारात कार पलटी होऊन झालेल्या अपघातात सुनील यशवंत काळोखे (५२) रा. धुळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस हवालदार राजेंद्र बागूल यांनी किल्ला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कार क्रमांक एमएच १८ बीसी ६०५२ वरील चालक (नाव माहीत नाही) याने नाशिकबाजूकडून धुळेकडे जात असताना महामार्गावरील पुलाच्या कठड्याला धडक दिली. या धडकेत कार पलटी होऊन काळोखे यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार अहिरे करीत आहेत.
----
रस्ता कामाच्या चौकशीची मागणी
मालेगाव : तालुक्यातील रावळगाव फाटा ते आघार बु।। रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यांवरील साईडपट्ट्या व सिलकोट उखडले आहेत. या रस्ता कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महेंद्र हिरे व ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या उपअभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. रस्त्याची पाहणी करून रस्ता हा अंदाज पत्रकाप्रमाणे झाला आहे की नाही याची चौकशी करावी, अशी मागणी हिरे यांनी केली आहे.