नाशिक : मागील बारा दिवसांपासून बंद असलेले बाजार समित्यांचे कामकाज सोमवारपासून पूर्ववत होत असले, तरी बाजार समित्यांमध्ये किरकोळ व्यवहार पूर्णपणे बंद राहणार असून, सर्वच बाजार समित्यांना दिवसभरात केवळ ५०० वाहनांमधील शेतमालाचा लिलाव करता येणार आहे. यासाठीची तयारी बाजार समित्यांनी पूर्ण केली असली, तरी कोविड चाचणीबाबत अद्यापही बाजार समिती व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १२ मेपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केले होते. यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. अनेक शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागली तर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली होती. बारा दिवसांनंतर सोमवारपासून बाजार समित्यांचे कामकाज सुरु करण्यास जिल्हा व्यवस्थापनाने परवानगी दिली असून, यासाठी बाजार समित्यांना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बाजार समित्यांमध्ये प्रत्येक आवारात ५०० वाहनांमधील शेतमालाचा लिलाव होणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांना आगाऊ नोंदणी करावी लागणार आहे. बाजार समिती व्यवस्थापनातील सर्व घटकांची कोविड चाचणी आवश्यक राहणार आहे. जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समित्यांना दिलेल्या पत्रासोबतच या अटी, शर्ती मान्य असल्याचे प्रमाणपत्र बाजार समिती सचिवांना जिल्हा उपनिबंधकांना द्यावे लागणार आहे.
चौकट-
कोविड चाचणीबाबत संभ्रम
बाजार आवारात शेतमाल घेऊन येणाऱ्या व्यक्तीला सात दिवसांपूर्वीचा कोविड चाचणी अहवाल सक्तीचा करावा, असे जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समित्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. तर आस्थापनेमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर अथवा आएटी चाचणी १५ दिवसांच्या आत करुन घेणे सबंधित आस्थापनेवर बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिध्द केलेल्या परिशिष्ट ‘ब’मध्ये म्हटले आहे. यामुळे चाचणी नेमकी किती दिवसांनी करायची, याबाबत शेतकरी आणि बाजार समित्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. काही समाजमाध्यमांवर शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये येताना दर आठ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे, अशी खोडसाळ माहिती पसरवली जात असून, अधिकृत अधिसूचनेत अशी कोणतीही अट घालण्यात आलेली नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
चौकट-
लासलगाव बाजार समितीने केली ९८४ व्यक्तींची चाचणी
सोमवारपासून बाजार समित्या सुरु करण्याची तयारी जिल्ह्यातील बाजार समित्यांनी केली असून, यासाठी शेतकऱ्यांची आगाऊ नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र मोबाईल नंबर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, त्यांच्याच मालाचा लिलाव होणार आहे. लासलगाव बाजार समितीने संबंधित ९८४ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली असून, बाजार समितीतील व्यापाऱ्यांचीही चाचणी करण्यात आल्याची माहिती सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांनीही आपापल्यापरिने तयारी पूर्ण केली आहे.