मालेगाव : परिसरातील शेतकऱ्यांच्या वाहनांची लागली रांगमालेगाव कॅम्प : मालेगाव कृषी उत्पन्न बाजारमध्ये गेल्या सप्ताहापासून मक्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. तालुक्यासह नांदगाव, मनमाड, सटाणा येथील शेतकरीबांधवांनी हजारो क्विंटल मका विक्रीस आणला आहे.शहर तालुक्यात दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपला मका विक्री करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. त्यामुळे बाजार समिती व समोरील पोलीस कवायत मैदानावर शेकडो ट्रॅक्टर व इतर लहान मोठ्या वाहनांची जत्रा भरली आहे. अचानक झालेल्या गर्दीमुळे बाजार समितीची तारांबळ उडाली. बाजार समिती परिसरासह कवायत मैदानावर या ट्रॅक्टर व इतर वाहनांना शिस्तबद्ध पद्धतीने उभे ठाकून शेतकरी बांधवांना टोकन पद्धतीने पुकारले जात होते. जादा वाहन संख्या, जास्तीची आवक व लिलावास होणारा विलंब यामुळे शेतकरीवर्गाला २४ ते ३६ तासांची प्रतीक्षा आपला माल लिलावात ठेवण्यासाठी करावी लागत होती.तालुक्यासह इतर तालुक्यातील लोणप्रिंप्री, पळशी, सावकारवाडी, शिरसगाव, टाकळी, म्हाळशेंवगा, पिलखोड, गरबड, अजंग, वडेल, नामपूरसह असंख्य लहान मोठ्या गावातून मका विक्रीसाठी शेतकरी वर्गाने गर्दी केली. गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी कमाल १२५० ते किमान ९५० असा दर मिळाला होता तर दररोज १५ हजार क्विंटलहून जादा आवक सुरू होती, परंतु गेल्या दोन दिवसांपासून या घडामोडींवर अंकुश आला आहे. मकाची आवक व जावक यामुळे बाजार समिती आवारात चहूबाजूला मकाच्या राशी साठल्या आहे तर वाहनांमुळे बाजार समिती परिसर, कॅम्प रस्ता, कवायत मैदानावर अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, दिवाळीनिमित्त मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि मुंगसे उपबाजाराला सुटी असल्याने नेहमी शेतकऱ्यांची वर्दळ असणाऱ्या बाजार समिती आवार ओस पडले होते. (वार्ताहर)
बाजार समिती आवारात मक्याची आवक
By admin | Published: October 31, 2016 12:46 AM